शिंदे वासुली -प्रेमप्रकरणातून करंजविहिरे (ता. खेड) येथील माणुसकी हॉटेलमध्ये शुक्रवारी (दि. 16) दुहेरी हत्याकांड घडले. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली. हा प्रकार शनिवारी (दि. 17) सकाळी उघडकीस आला.एका मृताच्या पत्नीचा आरोपीमध्ये समावेश आहे. याप्रकरणी चाकण पोलिसांनी अवघ्या काही तासांतच हॉटेलमालक, मृताच्या पत्नीसह नऊ जणांना अटक केली आहे. दरम्यान, भामखोरे परिसरात प्रेमसंबंधातून खून होण्याची ही तिसरी घटना असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
वीटभट्टीवर काम करणारे कामगार बाळू सीताराम गावडे (वय 32), राहुल दत्तात्रय गावडे (वय 20 दोघे रा. ठाकरवस्ती, आसखेड खुर्द, ता. खेड) असे हत्या करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. बाळू ऊर्फ आप्पा नामदेव मरगज (वय 45), ललिता बाळू मरगज (वय 35), प्रसाद बाळू मरगज (वय 20), अभिषेक बाळू मरगज (वय 19), आनंदा सीताराम जाधव (वय 32), राजू साहेबराव गावडे (वय 43), अनिल संभाजी कडाळे (वय 21), किरण बाळू मेंगाळ (वय 21 सर्व, रा. करंजविहिरे, ता. खेड) यांसह एका महिलेचा समावेश आहे. तर दत्तात्रय दशरथ गावडे (वय 40, रा. ठाकरवस्ती आसखेड खुर्द, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे.
करंजविहिरे येथील हॉटेल माणुसकीच्या समोर वीटभट्टी आहे. वीटभट्टीवर काम करणारे कामगार बाळू गावडे आणि विटभट्टीचालकाच्या 21 वर्षीय मुलीचे एकमेकांवर प्रेम जडले होते.
त्यामुळे दोघे जण दोन दिवसांपूर्वी पळून गेले होते. यात त्यांना राहुल गावडेने मदत केली होती. याची माहिती मुलीच्या नातेवाइकांसह बाळूच्या बायकोला लागतच त्यांनी दोघांचाही शोध घेऊन हॉटेल माणुसकी येथे आणले. हॉटेलमधील खोलीत दोघांनाही लाडकी दांडके, क्रिकेटची बॅट, लोखंडी रॉडने मारहाण करीत लोखंडी रॉड गरम करून त्याचे अंगावर चटके देवून दोघांचा कायमचा काटा काढला.
तर मुलगी पळून गेली म्हणून तिलाही मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलीस उप आयुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी भेट देली. चाकणचे वरिष्ठ निरीक्षक अशोक राजपूत, निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे, सहायक निरीक्षक विक्रम गायकवाड, उपनिरीक्षक विजय जगदाळे, विकास पंचमुख, सहायक फौजदार अदिनाथ नागवणे, संजय घाडगे, पोलीस नाईक हनुमंत कांबळे, मनोज साबळे, अशोक दिवटे, उद्धव गर्जे, पोलीस कॉस्टेबल प्रदीप राळे यांनी अवघ्या काही तासांतच आरोपींच्या मुसक्या आवळल्या. चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक रजपूत तपास करीत आहेत.