फुलराणी सायनाच्या हाती भाजपचे कमळ

नवी दिल्ली : भारताची फुलराणी अर्थात्‌ बॅडमिंटनपटू सायना नेहवालने आज आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. नवी दिल्ली येथील भाजप मुख्य कार्यालयात सायना नेहवालने भाजपमध्ये प्रवेश केला. यासह बॅडमिंटन कोर्टवरून सायना आता थेट राजकारणाच्या मैदानात उतरली आहे.सायना सोबतच तिच्या बहिण चंद्रांशु नेहवालनेही भाजपमध्ये प्रवेश केला.

सायनाच्या रुपाने आणखी एक क्रीडापटू राजकारणातून सेकंड इनिंग सुरु करत आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सायनाच्या रुपाने भाजपला “स्टार प्रचारक’ मिळाला आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह, कैलाश विजयवर्गीय आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत सायना नेहवालचा भाजपप्रवेश झाला.
भाजप प्रवेशानंतर सायना नेहवाल म्हणाली, भाजप चांगले काम करत असल्याने मी भाजप सदस्य म्हणून कामकाज करणार आहे. मी एक कष्टकरी व्यक्ती असून मला कष्टकरी लोक आवडतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशासाठी रात्रंदिवस काम करत आहेत. जर मी त्यांच्याबरोबर देशासाठी काही केले तर ते मी माझे भाग्य मानते. ते मला प्रेरणा देतात, असे तिने सांगितले.

यापूर्वी कुस्तीपटू योगेश्वर दत्त आणि बबिता फोगट यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. एवढेच नव्हे तर या दोघांनी हरियाणा लोकसभा निवडणुकही लढवली होती. मात्र दोघांनाही या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता.

हैदराबादमध्ये राहून बॅडमिंटन जगात मोठे नाव कमावणाऱ्या सायना नेहवालचा जन्म 1 मार्च 1990 रोजी हरियाणामधील हिसार येथे झाला. जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत 23 मे 2015 रोजी ती जगातील प्रथम क्रमांकावर आली होती. पहिल्या क्रमाकांवर येणारी सायना पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली होती. सायनाकडे 22 सुपर सिरीज आणि ग्रॅंड प्रिक्‍सचे जेतेपद आहेत. याव्यतिरिक्त 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये सायनाने कांस्यपदक जिंकले होते. बॅडमिंटनमध्ये पदक जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.