कोंढवा – पुणे महापालिकेत 2017 मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या उंड्रीसह आजूबाजूच्या 16 गावांतील नागरिकांना मूलभूत नागरी सुविधांसाठी झगडावे लागत असताना पाचपट वाढीव दराने कर महापालिकेला भरावा लागत आहे.
याबाबत पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य व उंड्रीचे सरपंच निवृत्ती बांदल यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची बारामतीत भेट घेत या गावांच्या समस्यांबाबतचे गाऱ्हाणे मांडले.
याबाबत निवृत्ती बांदल यांनी सांगितले की, 34 गावांपैकी पहिल्या टप्प्यात उंड्रीसह 11 गावे 2017 मध्ये पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात आली होती. इतर काही गावे मिळून हवेली तालुक्यातील 16 गावांमध्ये गेल्या चार वर्षांमध्ये सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पिण्याचे पाणीपुरवठा व्यवस्थापन पूर्णतः कोलमडल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असून पाणी विकत घ्यावे लागत आहे.
रस्ते, ड्रेनेज, आरोग्य सुविधा, वीज आदी सुविधा पुणे महापालिकेकडून पुरेशा प्रमाणात पुरविल्या जात नसल्याने येथील नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच भर म्हणून ग्रामपंचायतीपेक्षा पाचपट वाढीव दराने कर पालिकेला भरावा लागत आहे. सुविधा न देता केवळ वाढीव कर आकारणीमुळे नागरिक त्रस्त आहेत.
या सर्व समस्यांबाबत पवार यांच्याशी सविस्तर चर्चा करून या समस्यांबाबत लक्ष वेधल्याचे बांदल यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे दीपक बांदल, डॉ. हेमंत बालगुडे, महेश औताडे, विजय कामठे, अविनाश तळेकर, अरुण मांढरे उपस्थित होते.