पुणे -मार्केट यार्डात सीताफळाची आवक वाढू लागली आहे. पल्प व्यवसाय सुरू होत आहे. घरगुती ग्राहकांकडूनही मागणी वाढली आहे. फळ विभागातील घाऊक बाजारात किलोस दर्जानुसार 15 ते 150 रुपये भाव मिळत असल्याची माहिती व्यापारी माऊली आंबेकर आणि पांडुरंग सुपेकर यांनी दिली.
जून महिन्यात सुरू झालेला सीताफळाचा हंगाम डिसेंबर अखेरपर्यंत सुरू असतो. हळूहळू आवक आणखी वाढणार आहे. सीताफळ आरोग्यवर्धक फळ आहे. नागरिक आवर्जून या फळाची वाट पाहत असतात.
जिल्ह्यातील पुरंदर, हवेली आणि शिरूर तालुक्यांतून मार्केट यार्डात आवक होत आहे. पाठीमागे झालेल्या पावसामुळे प्रतवारी समाधानकारक आहे. आणखी पाऊस झाल्यास फळाला फायदाच होणार आहे. आकर्षक फळ नागरिकांचे लक्ष वेधत आहे. रविवारी येथील बाजारात सुमारे 15 ते 20 टन मालाची आवक झाली.
मागील वर्षी करोना परिस्थितीचा फटका सीताफळ विक्रीला बसला होता. पल्प, आईस्क्रीम उद्योग बंद असल्याने आणि लग्नकार्यासह विविध सोहळ्यांवर असलेल्या निर्बंधामुळे सीताफळांना मागणी नव्हती. सर्वसामान्य नागरिकांमध्येही थंड फळ असल्याने गैरसमज होते. मात्र, आता सर्व गैरसमज दूर झाले आहेत.
घरगुती ग्राहकांकडून खरेदी करण्यात येत आहे. पल्प, आईस्क्रीम उद्योग सुरू झाले आहेत. त्यामुळे सीताफळांना मागणी आहे. समाधानकारक भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
– माऊली आंबेकर,मार्केट यार्डातील व्यापारी