मोदींकडून गणेश मूर्ती, मौल्यवान हिरा आणि येत्स यांचा ग्रंथ भेट
वॉशिंग्टन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांना चंदनाची एक पेटी भेट दिली आहे. म्हैसूरमध्ये बनवलेल्या या चंदनाच्या पेटीवर जयपूरच्या कारागिरांनी नक्षीकाम कोरलेले आहे. या पेटीमध्ये गणेशाची मूर्ती आहे. ही चांदीची मूर्ती कोलकात्यातील गेल्या पाच पिढ्यांपासून सोनार काम करणाऱ्या प्रख्यात सोनार कुटुंबाने घडवली आहे. ज्यो बायडेन हे पुढील महिन्यात वयाची 80 वर्षे पूर्ण करणार आहेत. वयाची 80 वर्षे आणि 8 महिन्यांनंतर “सहस्रचंद्रदर्शन’ केलेल्या भाग्यवंतांमध्ये बायडेन यांची गणना होणार असल्याने या पेटीवर “दृष्टा सहस्रचंद्रो’ अशी शुभेच्छा कोरण्यात आली आहे.
प्रख्यात आयरिश कवी विल्यम बटलर येत्स यांनी 1937 साली उपनिषदांचा इंग्रजीमध्ये अनुवाद केला होता. “टेन प्रिन्सिपल्स ऑफ उपनिषदाज’ या ग्रंथाची प्रत मोदींनी बायडेन यांना भेट दिली. ज्यो बायडेन यांच्या पत्नी जिल बायडेन यांना मोदींनी 7.5 कॅरेटचा हिरा भेट दिला. 7.5 कॅरेट शुद्धता ही भारत अमेरिकेदरम्यानच्या 75 वर्षांच्या मैत्रीचे प्रतीक मानले गेले आहे.
बायडेन दाम्पत्याने 20 व्या शतकातील एक दुर्मिळ ग्रंथ पंतप्रधान मोदींना भेट दिला आहे. याशिवाय जुन्या जमान्यातील एक कॅमेरा, अमेरिकेतील वन्य जीवांच्या छायाचित्रांचे पुस्तक आणि कवी रॉबर्ट फ्रोस्ट यांच्या निवडक कवितांचे एक पुस्तकही मोदींना भेट देण्यात आले आहे.
तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेच्या फर्स्ट लेडी डॉ. जिल बायडेन यांनी भारत आणि अमेरिका : भविष्यासाठी कौशल्य विकास या विषयावरील कार्यक्रमात भाग घेतला. समाजात दर्जेदार शिक्षणाचा विस्तार आणि संधी वाढवण्यासाठी उच्च शिक्षण संस्थांमधील मनुष्यबळाच्या पुनर्विकासावर हा कार्यक्रम केंद्रित होता.
भारताने शिक्षण, कौशल्य आणि नवोन्मेषाला चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उचललेल्या पावलांवर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. सुरू असलेल्या द्विपक्षीय शैक्षणिक देवाणघेवाण आणि भारतीय तसेच अमेरिकी शैक्षणिक आणि संशोधन परिसंस्था यांच्यातील सहकार्याचे त्यांनी कौतुक केले. शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात भारत-अमेरिका सहकार्याला ऊर्जा देण्यासाठी 5 कलमी प्रस्ताव पंतप्रधानांनी सादर केला. या कार्यक्रमाला नॉर्दर्न व्हर्जिनिया कम्युनिटी कॉलेजचे पदाधिकारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.