300 पट वेगाने बनतात व्हीएफएक्स; भारतात 7900 कोटींची बाजारपेठ
मुंबई / बंगळुरू : 600 कोटींचा चित्रपट आदिपुरुष वाईट व्हीएफएक्समुळे ट्रोल होत आहे. पण सध्या स्पेशल इफेक्ट्स भारतीय चित्रपटांचा महत्त्वाचा भाग बनले आहेत. त्यामुळेच 2020 मध्ये 7900 कोटी रुपयांवर असलेला भारतातील व्हीएफएक्स व्यवसाय 2024 मध्ये 14,700 कोटींवर पोहोचला असेल.
हॉलिवूडच्या तुलनेत बॉलिवूड चित्रपटांचे स्पेशल इफेक्ट्स कमी लेखले जातात. त्याची अनेक कारणे आहेत. हॉलिवूड आता व्हीएफएक्स बनवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच “एआय’चा अवलंब करत आहे. मात्र, भारत याबाबतीत खूप मागे असल्याचे दिसत आहे. ऐतिहासिक डेटा, बॉक्स ऑफिसचा ट्रेंड आणि चित्रपट चालण्याची किंवा न चालण्याची शक्यतादेखील “एआय’कडून सांगण्यात येत आहे.
जॉनर, कलाकार, दिग्दर्शक, मार्केटिंग, रिलीज डेट आणि स्पर्धा पाहता या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरची कामगिरी आतापासूनच समजू लागली आहे. यामुळे बजेट, वितरण आणि धोरणाशी संबंधित नियोजन अधिक चांगल्या पद्धतीने करण्यास मदत होत आहे.
“एआय’च्या वापरामुळे हॉलिवूड चित्रपटांचे व्हीएफएक्स पूर्वीपेक्षा अधिक वास्तववादी दिसू लागले आहेत. सोबतच चित्रपट निर्मितीला कालावधीही कमी लागत आहे. निर्मात्यांचे जवळपास 65 कोटी रुपये वाचत आहेत. तसंच व्हीएफएक्स बनवण्याचे कामही 300 पट अधिक वेगाने होत आहे.
300 पट वेग
मॉन्सटर्स एलियंस रोबोट्स जॉम्बीस (मार्झ) एक व्हीएफएक्स कंपनी आहे. ती “एआय’चा वापर करून हॉलिवूड चित्रपटांचे व्हीएफएक्स तयार करत आहे. त्यांचे व्हॅनिटी नावाचे एआय टूल पारंपरिक व्हीएफएक्सपेक्षा 300 पट वेगाने व्हीएफएक्स तयार करते, जे स्वस्तदेखील आहे. याद्वारे त्यांच्या प्रत्येक ग्राहकाने सुमारे 8 दशलक्ष म्हणजे सुमारे 65 कोटी रुपयांची बचत केली आहे आणि चित्रपट निर्मितीमध्ये सुमारे 100 आठवडेही शिल्लक आहेत. “मार्झ’ने स्पायडरमॅन : नो वे होम, स्ट्रेंजर थिंग्स (एस-4), गॅसलाइट, फर्स्ट लेडीज, बीइंग द रिकार्डोस सारख्या शो आणि चित्रपटांसाठी मार्व्हल, डिस्ने, ऍपल टीव्ही, नेटफ्लिक्स अशा स्टुडिओसाठी एआय वापरून व्हीएफएक्स तयार केले आहे.