सहकारनगर, दि. 20 (हर्षद कटारिया) – प्रसूतीवेदनेने आक्रोश करणारी गाय..अर्धवट बाहेर आलेले वासरू…त्यांच्यावर भुंकणाऱ्या भटक्या श्वानांची टोळी..अशा हृदयद्रावक प्रसंगात स्थानिक कार्यकर्ते धावून आले आणि त्यांनी या गायीची सुखरूप प्रसूती केली. कोणत्याही संवेदनशील माणसाला हेलावून टाकणारा हा प्रसंग सहकारनगर परिसरात घडला. सध्या ही गाय आणि वासरू सुरक्षित आहेत.
लक्ष्मीनगर येथे गजानन महाराज चौकात गाईला प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्या असह्य झाल्याने तिने टाहो फोडला. रस्त्याने जाणारे नागरिक हे पाहत होते. अनेकांना मदत करण्याची इच्छाही होत असेल, पण कोणी पुढाकार घेत नव्हते. दरम्यान, ही माहिती आधार फाउंडेशनचे कार्यकर्ते महेंद्र चौहान-ठाकूर, विनायक देसाई व रामनवमी उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना समजली. त्यांनी तातडीने पशुवैद्यकांचा फोनवर सल्ला घेतला आणि नैसर्गिक पद्धतीने गाईची प्रसूती एका घराबाहेर केली. नवजात वासराला गाईने वात्सल्याने जवळ घेतले. वासरू सुरक्षित असल्याचे पाहून तिलाही आनंद झाला असावा… यावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला. आधार फाउंडेशन आणि रामनवमी उत्सवाचे कार्यकर्ते दोन्ही जिवांची काळजी घेत आहेत. आधार फाउंडेशनचे प्रशांत थोपटे, महेंद्रसिंग चौहान, विनायक देसाई आणि त्यांच्या मित्रांनी प्रसंगावधान दाखवत गोरक्षणाचे कार्य केल्याची भावना व्यक्त होत आहे.
या वासराच्या जन्मावेळी गायीची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली. गाईचा मालक कोण आहे समजले नसून कुणाला स्वेच्छेने या गाय-वासराची सेवा करायची असल्यास महेंद्रसिंग चौहान, रामराज्य मित्र परिवार, आधार फाऊंडेशन यांच्याशी संपर्क साधावा.
– प्रशांत थोपटे, आधार फाउंडेशन