लॉस एंजेलिस : भारतीय-अमेरिकन वंशाचे गुगल आणि अल्फाबेट या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांना कंपनीने तब्बल 2 दशलक्ष डॉलर्स (14 कोटी रुपये) इतकी पगारवाढ दिली आहे. सीएनबीसी या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार सुंदर पिचाई यांची “टेक होम सॅलरी’ यंदा 2 दशलक्ष डॉलर्सने वाढणार आहे. त्याशिवाय पिचाई यांना 120 दशलक्ष डॉलर्सचे शेअर्ससुद्धा दिले जातील.
नुकतीच गुगलचीच मूळ कंपनी असलेल्या अल्फाबेटच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदाची जबाबदारी सुंदर पिचाई यांच्यावर सोपवण्यात आली. या जबाबदारी-सोबतच सुंदर पिचाई आता जगातील सर्वात शक्तिशाली कॉर्पोरेट व्यक्तिमत्त्व बनले आहेत. गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज आणि सर्गे ब्रिन यांनी अल्फाबेटची धुरा पिचाई यांच्यावर सोपवली आहे.
अल्फाबेटने युनायटेड स्टेटस सिक्युरिटी अँड एक्स्चेंज कमिशनला दिलेल्या माहितीनुसार पिचाई यांना 120 दशलक्ष डॉलर्सचे शेअर्ससुद्धा (स्टॉक ऑप्शन) दिले जातील. गुगलक्ष अहवालानुसार पिचाई यांचे वार्षिक सॅलरी पॅकेज 6 लाख 50 हजार डॉलर आहे. या अहवालात 120 दशलक्ष डॉलर्सच्या शेअर्सचा पिचाई यांना कशा प्रकारे लाभ मिळणार याचीदेखील माहिती देण्यात आली आहे.
तसेच पिचाई यांना प्रोत्साहन भत्त्यापोटी 45 दशलक्ष डॉलर्स मिळणार आहेत. 2014 पासून पिचाई यांना स्टॉक ऑप्शनमधून 550 दशलक्ष डॉलर्स मिळाले आहेत. पिचाई यांना 2015 साली 6 लाख 52 हजार 500 अमेरिकन डॉलर एवढा पगार मिळाला होता. पिचाई यांना 2016 या वर्षात पगार व अन्य भत्त्यांच्या स्वरूपात आजवर तब्बल 12.85 अब्ज रुपये मिळाले आहेत. आधीच्या वर्षाच्या तुलनेत ही रक्कम दुप्पट आहे.