नवी दिल्ली : चांद्रयान-2 मोहिमेच्या प्रकल्प संचालिका एम. वनिता यांना चांद्रयान-3 मोहिमेत समाविष्ट करण्यात आलेले नाही. इस्रोच्या वैज्ञानिक एम. वनिता यांच्या जागी आता वीरामुतुवेल ह्या चांद्रयान-3 मोहिमेत काम करणार आहेत.
चांद्रयान-3 मोहिमच्या प्रमुख म्हणून रितू करिधाल यांच्यावर पुन्हा एकदा जबाबदारी असणार आहे. यापूर्वी चांद्रयान-2 च्या संचालिका म्हणूनही करिधाल यांनी जबाबदारी पार पाडली आहे. याशिवाय इस्रोने उपप्रकल्प संचालकांमध्येही बदल केले आहेत.
चांद्रयान-3 मोहिमेसाठी इस्रोकडून 29 उपप्रकल्प संचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे सर्व चांद्रयान-3 मोहिमेत वेगवेगळी भूमिका निभावणार आहेत.
भारताची चांद्रयान-2 मोहीम यशस्वी होऊ शकली नाही. चांद्रयान-2 मोहिमेत पाठवण्यात आलेले विक्रम लॅंडर चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी लॅंड होऊ शकले नव्हते.
चांद्रयान-2 मोहिमेनंतरच वनिता यांची बदली करण्यात आली होती. मात्र त्यांच्या बदलीचे कोणतेही कारण देण्यात आले नव्हते. एम.वनिता या उत्तम शास्त्रज्ञ असून त्यांची पॅलोड मॅनेजमेंट अँड स्पेस ऍस्ट्रोनॉमी एरियाचे (पीडीएमएसए) उपसंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी पी. वीरामुतुवेल यांनी चांद्रयान-3 मोहिमेत प्रकल्प संचालिका म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती इस्रोने दिली.