तिरुअनंतपुरम – केरळ सरकारने राज्यातील २६ हजाराहून अधिक आशा स्वयंसेविकांच्या मानधनात १००० रुपयांची वाढ केली आहे, असे राज्याचे अर्थमंत्री के एन बालगोपाल यांनी शनिवारी सांगितले. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यातील आशा कामगारांच्या वेतन वितरणासाठी एकूण ३१.३६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
यामुळे राज्यातील आशा कार्यकर्त्यांचे मानधन ७००० रुपयांपर्यंत जाईल आणि २६१२६ लोकांना याचा फायदा होईल, असे एका निवेदनात त्यांनी म्हटले आहे. गेल्या डिसेंबरपासून ही मानधन वाढ पूर्वलक्षी प्रभावाने लागू केली जाईल.
या क्षेत्रातील सेवकांचे मानधन संपूर्णपणे राज्य सरकार देते हे लक्षात घेऊन मंत्री म्हणाले की केंद्र आशा कामगारांना प्रोत्साहन म्हणून फक्त २००० रुपये प्रदान करते. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून राष्ट्रीय आरोग्य अभियान च्या उपक्रमांसाठी मंजूर केलेल्या रकमेचे वाटप केंद्र सरकारने केलेले नाही असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले.