काबूल : अफगाणिस्तानचे अध्यक्ष म्हणून अश्रफ घनी यांना सलग दुसरा कार्यकाळ मिळणार असल्याचे रविवारी स्पष्ट झाले. अर्थात, विरोधकांकडून निकालाला आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे घनी यांना पुन्हा सुत्रे स्वीकारण्यास प्रतीक्षा करावी लागू शकते.
अफगाणिस्तानमध्ये अध्यक्षीय निवडणुकीसाठी 28 सप्टेंबरला मतदान झाले. त्या निवडणुकीतील प्राथमिक मतमोजणीचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यानुसार, घनी यांना 50.64 टक्के मते मिळाली. त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी आणि अफगाणचे मुख्य कार्यकारी अब्दुल्ला अब्दुल्ला यांना सुमारे 40 टक्के मतदारांच्या पाठिंब्यावरच समाधान मानावे लागले.
अर्थात, अब्दुल्ला यांनी निकाल मान्य केलेला नाही. त्यांनी निकालाला आव्हान देण्याचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे अंतिम निकालासाठी आणखी काही अवधी लागणार आहे. अध्यक्षीय निवडणुकीचा प्राथमिक निकाल याआधीच येणे अपेक्षित होते. मात्र, विरोधकांनी केलेले गैरप्रकारांचे आरोप आणि तांत्रिक समस्यांमुळे त्याला विलंब लागला.
अब्दुल्ला यांच्या समर्थकांनी विविध प्रांतांमध्ये प्राथमिक मतमोजणीची प्रक्रिया रोखली. त्यांच्या समर्थकांनी मागील महिन्यात अफगाणची राजधानी काबूलमध्ये मोर्चाही काढला. बोगस मतदानाचा आरोप अब्दुल्ला समर्थकांकडून करण्यात आला. त्यामुळे अफगाणमधील मतमोजणी वादग्रस्त ठरली आहे