Russia-US face-off : मागील महिन्यात रशियाने अमेरिकेच्या दोन अधिकाऱ्यांना देश सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर अमेरिका आणि रशिया यांच्यातील वाद आता चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण अमेरिकेने रशियन दूतावासातील दोन अधिकाऱ्यांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाकडे दोन्ही देशांमधील संबंध बिघडण्याची सर्वोच्च पातळी म्हणून पाहिले जात आहे.
गेल्या महिन्यात रशियाने मॉस्कोला दोन अमेरिकन अधिकाऱ्यांना देश सोडण्यास सांगितले होते. रशियाच्या या कृतीला उत्तर देण्यासाठी अमेरिकेने देखील रशियन दूतावासातील दोन अधिकाऱ्यांना देश सोडून जाण्याचे आदेश दिले असल्याचे म्हटले जात आहे.
रशियाने आरोप केला होता की, हे दोन्ही अधिकारी एका माजी कॉन्सुलर कर्मचाऱ्याच्या संपर्कात होते, ज्यावर संवेदनशील माहिती गोळा केल्याचा आरोप आहे. मात्र, अमेरिकेने या आरोपांना निराधार म्हटले होते.
रशियाच्या निर्णयानंतर अमेरिकेनेही रशियन अधिकाऱ्यांना देश सोडण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली आहे. रशियाने अमेरिकन अधिकारी जेफ्री सिलिन आणि डेव्हिड बर्नस्टीन यांना तेवढाच वेळ दिला होता. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी एका निवेदनात, “रशियन सरकारकडून आमच्या अधिकाऱ्यांचा होणारा छळ परराष्ट्र विभाग खपवून घेणार नाही.” असे म्हटले आहे.