पुणे – परदेशांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी कमला नेहरू रुग्णालयात लस घेण्यासाठी मंगळवारी गर्दी केली. आवश्यक कागदपत्रे आधीच इ-मेलवर पाठवून देण्यासंदर्भात त्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. दिवसभरात 220 विद्यार्थ्यांना लस देण्यात आली.
ही लस घेण्यासाठी पूर्वनोंदणीची आवश्यकता नव्हती, तरीही कागदपत्रे इमेलवर पाठवणे बंधनकारक होते. यामध्ये परदेशांत ज्या विद्यापीठात जायचे आहे त्यांचे प्रवेश दिल्याचे पत्र, व्हिसा आणि अन्य आवश्यक कागदपत्रांचा समावेश होता.
याची माहिती एका फलकावर रुग्णालयाच्या बाहेर लावण्यात आले होते. तसेच तेथे माहिती देण्यासाठीही एका कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली होती. त्यांच्याकडून सगळी माहिती विद्यार्थ्यांना आणि पालकांना देण्यात आली.
ज्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली आहे त्यांनाच लस मिळणार असल्याचे आधीच जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार पाचव्या मजल्यावर असेच विद्यार्थी लस घेण्यासाठी थांबले होते.
ही लस महापालिका हद्दीतील विद्यार्थ्यांना मिळेल हे आधीच जाहीर करण्यात आले होते. तरीही नगर आणि पुण्याच्या आजूबाजूच्या शहरांमधूनही विद्यार्थ्यांनी गर्दी केल्याचे दिसून आले.
“विद्यार्थ्यांसाठीचे हे लसीकरण वास्तविक दोनच दिवस ठेवले असले तरी दीड हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यांचे लसीकरण वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल,’ असे आश्वासन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहे.