राजस्थानात भाजपकडून महाराणी दियाकुमारी यांना आता वसुंधराराजेंना पर्याय म्हणून पुढे आणले जात आहे. दियाकुमारी या वसुंधराराजे यांना पर्याय ठरतील का, याबाबत ऊहापोह…
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये यावेळी राजस्थानातील निवडणूक अधिक चुरशीची असणार आहे. विशेषतः राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांचे भवितव्य या निवडणुकांमधून ठरणार आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर काही तासांतच भाजपने खासदार दियाकुमारी यांना जयपूरच्या विद्यानगर येथून मैदानात उतरविले. त्याचवेळी वसुंधराराजे यांच्या अनेक समर्थकांचे तिकीट कापले. दियाकुमारी यांना विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून महत्त्वाची भूमिका दिली जाणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. पण आता त्या वसुंधराराजेंना पर्याय म्हणून पुढे येताना दिसत आहेत.
अशा स्थितीत भाजपाची या राज्यातील स्थिती कशी असेल? अर्थात, वसुंधराराजे यांना पूर्णपणे बाजूला केले नाही. मात्र, दियाकुमारी यांना वसुंधराराजे यांच्या एका समर्थकाचे तिकीट कापूनच उमेदवारी दिली आहे. दियाकुमारी यांना विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून महत्त्वाची भूमिका दिली जाणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे व्यवस्थापन केल्यानंतर त्या प्रकाशझोतात आल्या होत्या.
प्रत्यक्षात माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांचे भवितव्य अंधातरी असल्याचे म्हटले जात होते आणि दियाकुमारी यांची राजकीय कारकीर्द अस्तंगत झाल्याचेही बोलले जात होते. पण सध्याच्या राजकीय हालचालीवरून पक्षाने त्यांना नव्या स्थानावर नेतृत्व विकसित करण्याचे आडाखे बांधलेले असल्याचे दिसून येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत राज्यातल्या दोन महिलांना दिलेले स्थान पाहता तो एकप्रकारे वसुंधराराजे यांना इशारा देण्याचा प्रयत्न तर नव्हता ना? अशी चर्चा सुरू झाली. त्या वसुंधराराजे यांना पर्याय राहू शकतील का? प्रत्यक्षात आनंदपाल एन्काउंटर प्रकरणामुळे निर्माण झालेल्या राजपुतांच्या नाराजीचा फटका भाजपला मागील निवडणुकीत बसला आणि किरकोळ मतांनी सत्ता गमवावी लागली. यावेळी भाजपकडून राजपूत मतपेढी मजबूत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विरोधी पक्षनेतेपदी देखील राजेंद्रसिंह राठोड यांना विराजमान करून भाजपने राजपूत समुदायाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. वसुंधराराजे यांना थोडेफार बाजूला केल्यानंतर भाजप आता राजस्थानात पक्षाचे संस्थापक आणि ज्येष्ठ नेते भैरोसिंह शेखावत यांचा वारसा पुन्हा जिवंत करण्याचे काम युद्धपातळीवर करत आहे.
खचरियावास येथे भाजप नेत्यांची वाढलेली वर्दळ हा त्याचाच पुरावा आहे. प्रत्यक्षात राजस्थानात राजपूत समुदायाची लोकसंख्या 14 टक्के आहे आणि त्याचा 60 विधानसभेवर थेट परिणाम होणार आहे. जयपूर, जालौर, जैसलमेर, बाडमेर, कोटा, उदयपूर, चित्तोडगड, अजमेर, नागौर, राजसमंद, पाली, बिकानेर, भिलवाडा या जिल्ह्यांत राजपूत मतांची नाराजी ही पक्षाला जबर किंमत मोजणारी राहू शकते. भाजपकडे अनेक राजपूत नेते आहेत. यापैकी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार राज्यवर्धन राठोड आदी नेते आहेत.
खासदार दियाकुमारी यांची गोष्ट वेगळी आहे. महाराणी गायत्रीदेवी यांचा वारसा त्यांच्याकडे आहे. भाजप त्यांना महत्त्वाची भूमिका सोपवून राजपूत समुदायात सकारात्मक संदेश देऊ इच्छित आहे. हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुकीत राजपूत मतांना आकर्षित करण्यासाठी भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थासाठी दियाकुमारी यांना मैदानात उतरविले होते. अशारितीने आगामी विधानसभा निवडणुकीत राजपूत समुदायांसाठी त्यांचा चेहरा समोर आणला जाईल, असा संदेश दिला आहे. हिमाचल प्रदेशातील निवडणूक प्रचारात उतरणाऱ्या त्या राजस्थानच्या भाजप नेत्यांच्या फळीतील एकमेव महिला नेत्या होत्या.
वसुंधराराजे यांना महाराणी नावाने ओळखले जाते. दियाकुमारीदेखील महाराणी आहेत. दोन्ही राजपूत असून अनेक वर्षांपासूनचे त्यांचे समर्थक भाजपचे मतदार आहेत. त्यामुळे भाजप एका गोष्टीवरून निर्धास्त आहे की, वसुंधराराजे नाराज जरी झाल्या तरी पक्षाला फारसे नुकसान होणार नाही. या दोन्हीतील राजकीय ताणाताणी कोणापासून लपून राहिलेली नाही. पण जयपूर घराण्याच्या राजकुमारी दियाकुमारी यांना वसुंधराराजे यांनीच राजकारणात आणले होते.
2013 मध्ये विधानसभा निवडणुकीत वसुंधराराजे यांनी किरोडीलाल मीणा यांना पराभूत करण्यासाठी सवाई माधोपूर विधानसभा मतदारसंघातून राजकुमारी दियाकुमारी यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा राजकुमारी दियाकुमारी यांनी गरिबांच्या झोपडीत जाऊन चूल पेटवून राजकीय लाभ घेतला. त्यानंतर पक्षाच्या हायकमांडने त्यांना खासदारकीचे तिकीट दिले. तेव्हापासून महाराणी दियाकुमारी यांचे नशीब फळफळले आहे. महाराणी दियाकुमारी या आघाडीच्या नेतृत्वासमवेत वावरल्या आणि पक्षाचा विश्वास मिळवण्यात यशस्वी ठरल्या. आता पुढे काय होईल हे येत्या महिन्यांत कळलेच.
राधिका बिवलकर