पिंपरी – गहुंजे येथे सोमवारी (दि. 30) विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2023 मधील श्रीलंका आणि अफगाणिस्तान हा एकदिवसीय क्रिकेट सामना होणार आहे. हा सामना क्रिकेटच्या चाहत्यांना प्रत्यक्ष मैदानावर जाऊन पाहण्यासाठी खास पीएमपीने गहुंजे स्टेडियमपर्यंत बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवारी (दि. 30) शहरात होणारा हा दुसरा सामना आहे. मागील वेळी झालेल्या क्रिकेट सामना पाहण्यासाठी सुमारे 600 क्रिकेट प्रेमींना प्रवास केला होता. त्यातून पीएमपीला सुमारे 50 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.
क्रिकेटच्या चाहत्यांना प्रत्यक्ष मैदानावर जाऊन क्रिकेट पाहण्यासाठी खास पीएमपीने गहुंजे स्टेडियमपर्यंत बसची सुविधा सुरू केली आहे. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2023 मधील एकूण 5 सामने गहुंजे स्टेडियम येथे होणार आहेत. त्यातील हा दुसरा सामना सोमवारी (दि. 30) श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे.
1, 8 आणि 11 नोव्हेंबरलाही गहुंजे येथे क्रिकेट सामने होणार आहेत. शहरातील नागरिकांसाठी निगडी टिळक चौक बस स्थानकातून दुपारी 12 व दुपारी 12.30 वाजता बस सुटणार आहेत. तर, 11 नोव्हेंबरला सकाळी 8.30 व सकाळी 9 वाजता बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तिकीट दर हा प्रत्येकी जाताना आणि येताना 50-50 रुपये असणार आहे.
पीएमपीकडून गहुंजे स्टेडियम येथे जाण्यासाठी पुणे मनपा भवन, कात्रज व निगडी टिळक चौक बस स्थानक या तीन ठिकाणांहून बस सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच गर्दी वाढल्यास आवश्यकतेनुसार तीनही बस स्थानकांवरून जादा बसचे नियोजन करण्यात येणार असल्याचे पीएमपी प्रशासनाने कळविले आहे. मागील वेळेचे प्रतिसाद पाहता या वेळीही बसचे नियोजन करण्यात आले आहे. मागील वेळी 600 जणांनी बसमधून प्रवास केला होता. त्यावेळी सुमारे 48 ते 50 हजार रुपयांचे उत्त्पन्न पीएमपीला मिळाले होते.