एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत गतविजेता इंग्लंडचाच संघ अत्यंत सुमार कामगिरी करत अखेर
स्पर्धेतून बाहेर पडला. ही इतकी नाचक्की का व कशामुळे झाली या खोलात तर शिरायचेच आहे; परंतु क्रिकेट या खेळाचे जन्मदातेच हा खेळ विसरले की काय, अशी शंका या स्पर्धेतील त्यांच्या कामगिरीवरून निर्माण होत आहे.
यंदाची स्पर्धा राउंड रॉबिन पद्धतीने खेळवली जात आहे. म्हणजे प्रत्येक सहभागी संघाने प्रत्येक संघाशी एक सामना खेळायचा व अखेरच्या साखळी फेरीतील सामन्यानंतर गुणतालिकेतील पहिले चार संघ उपांत्य फेरीत पात्र ठरतील. त्यातही भारत व दक्षिण आफ्रिका यांनी आपले वर्चस्व सिद्ध करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेशही निश्चित केला होता. तसेच अफगाणिस्तानचा थरारक पराभव करत ऑस्ट्रेलियानेही उपांत्य फेरी गाठली. चौथा संघही निश्चित झाला. मात्र, त्याचवेळी इंग्लंडचा संघ मागे पडला. हे का घडले तर त्यांचे खेळाडू सुमार दर्जाचे होते का, तर नाही. त्यांच्याकडे जागतिक दर्जाचे अनेक खेळाडू होते, तसेच त्यातील काही खेळाडू गेल्या अनेक मोसमांपासून आयपीएल स्पर्धा खेळत आहेत, म्हणजेच भारतात खेळण्याचा अनुभवही गाठीशी होता. तरीही त्यांच्या हाती अपयश लागले. याची खरेतर अनेक कारणे आहेत.
फलंदाजीच अपयशी
विश्वकरंडकसारख्या इतक्या मोठ्या स्पर्धेत खेळणारे प्रत्येक संघ प्रत्येक सामन्यात धडाकेबाज सलामी देत असताना इंग्लंडला ते जमत नव्हते. जॉनी बेअरस्टो, डेव्हिड मलान व लियाम लिव्हिंगस्टोन या अफलातून खेळाडूंचा संघात समावेश असूनही त्यांना मोठी सलामी कोणत्याही सामन्यात देता आली नाही. याचे एक कारण असेही आहे की, त्यांनी रोटेशन केले नाही. बेअरस्टो व मलान अपयशी ठरत असताना प्रयोग करायला हरकत नव्हती. मात्र, इंग्रज आपला मूळ गाभा बदलत नाहीत व तेच या स्पर्धेत दिसले. सलामीवीरांना अपयश आल्यावर तिसऱ्या क्रमांकावर तसेच चौथ्या व पाचव्या क्रमांकावरील फलंदाजाने म्हणजेच मधल्या फळीने डाव सावरायचा असतो. ते देखील केवळ दोनच सामन्यांत त्यांना करता आले.
भारताच्या विराट कोहलीच्याच दर्जाचा असलेला ज्यो रूट तर हजेरी पटावरचा कर्मचारीच वाटला. खेळपट्टीवर आल्यावर संघाची परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा बाद होण्याचेच प्रयत्न करत असल्यासारखे वाटले. हॅरी ब्रुक्स हा देखील त्यांचा भक्कम सेकंड बेंच मानला जात होता तो तर कुठेच प्रयत्न करताना दिसला नाही. या संघाकडे अष्टपैलूंची काहीही कमी नव्हती मात्र, तरीही ते अपयशाचे धनी बनले. कोणताही संघ केवळ गोलंदाजांवरच अवलंबून राहू शकत नाही. त्यातच इंग्लंडचा संघ म्हणजे 1970-80 सालातील वेस्ट इंडिजचा संघ नव्हे की समोरच्या संघाने 10 धावांत सर्वबाद केले तरीही वेस्ट इंडिज समोरच्या संघाचा 8 धावांत पराभूत करेल अशी त्यांची गोलंदाजी होती. इंग्लंडची गोलंदाजी हा तोफखाना तर नव्हेच उलट दिवाळीतील लवंगी फटाक्यांसारखाच होता.
अष्टपैलूंकडून मोठी निराशा
इंग्लंड संघाला सर्वात मोठा फटका बसला तो त्यांच्या अष्टपैलू खेळाडूंच्या सातत्यपूर्ण निराशाजनक कामगिरीचा. कर्णधार जोस बटलर, बेन स्टोक्स, डेव्हिड मलान, हॅरी ब्रुक्स, मोईन अली व ख्रिस वोक्स यांच्यामुळे तर स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीपासून त्यांचा संघ स्पर्धेतील सर्वात बलाढ्य संघ मानला जात होता. मात्र, प्रत्यक्षात स्पर्धा सुरू झाल्यावर इंग्लंडचा एकेका सामन्यात ज्या पद्धतीने पराभव होऊ लागला तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. चक्क अफगाणिस्तानसारख्या नवख्या संघानेही त्यांचे गर्वहरण केले. या पराभवामुळेच इंग्लंडचा संघ मानसिकरीत्या कोसळला. त्यानंतर भारतीय संघाविरुद्धही त्यांनी सुमार कामगिरी केली. आयपीएल स्पर्धेतील अनुभव एकाच्याही कामी आला नाही व इंग्लंडची फलंदाजी पत्त्यांचा बंगला कोसळावा तशी कोसळू लागली.
स्टोक्स व बटलर यांच्याकडून त्यांना प्रचंड अपेक्षा होत्या. त्या साफ फोल ठरल्या. एक बांगलादेश व नेदरलॅंड्सविरुद्धच्या सामन्यांचा अपवाद वगळता या स्पर्धेत इंग्लंडसाठी काहीच सकारात्मक घडले नाही. हे दोन सामने जिंकूनही हा गतविजेता संघ यंदाच्या स्पर्धेतून बाहेर फेकला गेला. या साखळी फेरीत अफगाणिस्तानसह श्रीलंकेनेही त्यांचा पराभव केला. ज्या श्रीलंकेच्या संघात भारतातील एखाद्या क्लबच्या दर्जाचे खेळाडू आहेत त्या संघाकडून मार खाल्ल्यानंतर तर इंग्लंडची प्रतिष्ठाच ढासळू लागली. मागे एकदा प्रख्यात क्रिकेटपटू व समालोचक जेफ बॉयकॉट म्हणाले होते की, ज्या संघात सर्वात जास्त अष्टपैलू असतात तो संघ सगळ्यात जास्त धोकादायक असतो. किमान मर्यादित षटकांच्या सामन्यांचा विचार करता. मात्र, इंग्लंडच्याच या बॉयकॉट यांचे विधान त्यांच्याच संघाने पार खोटे ठरवले.
खेळपट्टीवरून टीका निरर्थक
बीसीसीआयने या स्पर्धेतील इंग्लंडचे सामने ज्या मैदानांवर ठेवले होते तेथील खेळपट्ट्या तसेच सरावासाठीच्या खेळपट्ट्या यांवर बटलरने वारंवार टीका केली. “नाचता येईना अंगण वाकडे’ अशीच ही टीका होती. कारण त्याच मैदानांवर अन्य संघांनी इंग्लंडपेक्षा सरस कामगिरी केली व विजय प्राप्त केले. त्यातही असे काही संघ आहेत अफगाणिस्तान, श्रीलंका, पाकिस्तान यांनीही सुमार कामगिरीचे खापर खेळपट्टीवर फोडले नाही. हा आता पाकिस्तानच्या हसन राजाने भारतीय गोलंदाज गोलंदाजी करत असताना त्यांना आयसीसी वेगळे चेंडू देते असे हास्यास्पद विधान केले होते. हा बालिशपणा सोडला तर या संपूर्ण स्पर्धेत भारताच्या गोलंदाजीची जी दहशत अन्य संघांना बसली होती ती पाहता आपलीच पाठ थोपटून घ्यावीशी वाटते. कारण, जागतिक क्रिकेटमध्ये भक्कम फलंदाजीसाठी ओळखला जात असलेला भारतीय संघ पहिल्यांदाच भेदक गोलंदाजीसाठी ओळखला गेला. इंग्लंडकडे गोलंदाज नाहीत असा भाग नाही; पण सततच्या पराभवांमुळे त्यांचे मनोबल खालावले हे मात्र निश्चित.
मानसोपचार व आत्मपरीक्षणाची गरज
इंग्लंड संघाला आता खरेच कोणत्या गोष्टीची गरज आहे असे सांगायचे तर ते मानसोपचार व आत्मपरीक्षण यांचीच सर्वात जास्त गरज आहे. इंग्लंडचा संघ पूर्वी त्यांच्या देशात पराभूत होत असलेल्या संघांवर हसायचा, त्यांचे आजी-माजी खेळाडू देखील तोंडसुख घ्यायचे. समालोचकही टोकाची टीका करायचे. आपला संघ एकदा त्यांच्याकडून कसोटीत 5-0 असा पराभूत झाला होता तेव्हा भारतीय संघ विमानतळावरून मायदेशी रवाना होण्यासाठी आला तेव्हा त्यांच्या कस्टम अधिकारी व्यक्तीने आपला प्रचंड अपमानही केला होता. तुम्ही कशाला आमच्या देशात आलात आणि आमचा उन्हाळा खराब केलात. आम्ही वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंडला बोलावले असते तर बरे झाले असते, असे हा अधिकारी बोलला होता.
आज स्थिती वेगळी आहे. बीसीसीआयकडे इतका पैसा आहे की आपला संघ कोणत्या देशात गेला नाही तर त्या देशाला त्यांचे क्रिकेट चालवणे कठीण बनते. आता आत्मपरीक्षण करण्याची गरज इंग्लंड संघालाच नव्हे तर त्यांच्या थिंकटॅंकलाही आहे. केविन पीटरसन संघात लावालावी करतो असे आरोप करत त्याची कारकीर्द वेळेपूर्वीच संपवणारा इंग्लंडचा थिंकटॅंक आत त्यांच्याच संघाबाबत काय वर्तन करतो हे पाहणे अत्यंत उत्सुकतेचे बनले आहे. तसेच त्यांना आपण या स्पर्धेतील प्रत्येक लढतीत कसे खेळलो, कशी गोलंदाजी केली, कसे निर्णय घेतले याचे रिप्ले पाहिले तरीही त्यांच्या चुका त्यांच्या लक्षात येतील.
त्याचबरोबर पाकिस्तानपेक्षाही जास्त मानसोपचारांची गरज इंग्लंड संघाला आहे. भारतात एकदम राजेशाही स्वागत झालेला पाकिस्तानचा संघ भारताकडून तसेच अन्य संघांकडून पराभूत झाला तेव्हा त्यांच्याच प्रशिक्षकाने आम्हाला मानसोपचारांची गरज असल्याचे म्हटले होते. त्याने केवळ असे म्हटले मात्र, खरी गरज इंग्लंड संघाला आहे यात कोणाचेही दुमत नसावे. मानसोपचार म्हणजे एखाद्याला वेडा ठरवणे असेच किमान भारतात तरी मानले जाते पण परदेशात त्याचे महत्त्व वेगळे सांगायची गरज नाही. त्यांच्याकडचे सेलिब्रिटी, अभिनेते तसेच खेळाडू देखील अपयशातून बाहेर येत सकारात्मक मानसिकतेसाठी अशा मानसोपचारांची मदत घेतात. फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम हे त्याचे ताजे उदाहरण आहे. असो.
परंपरा जपणारा, क्रिकेटचा प्रचंड मोठा इतिहास असलेला व सर्वात मुख्य म्हणजे क्रिकेट हा खेळच ज्यांनी शोधला व जगभरात लोकप्रिय झाला त्याचे जन्मदातेच हा खेळ कसा खेळायचा हे विसरले की काय, असेच सध्या चित्र दिसत आहे. जागतिक क्रिकेटमध्ये एकेकाळी महासत्ता असलेल्या वेस्ट इंडिज व ऑस्ट्रेलिया यांची सध्या कशी अवस्था झाली आहे व कायम डलडॉग्ज म्हणून हिणवल्या गेलेल्या भारतीय संघाची आज उंची काय आहे याचा इंग्लंडचा संघ, त्यांचे क्रिकेट मंडळ व सोकॉल्ड व्हाइट कॉलर समीक्षक यांनी अभ्यास जरी केला ना तरीही त्यांच्या प्रश्नांची सर्व उत्तरे त्यांना मिळतील व त्यानंतरच तोडगा निघेल.
अमित डोंगरे