“हे कसले पुस्तक आहे रे”, मिहीरच्या कपाटातील पुस्तके आवरताना प्रणवच्या हाती एक पुस्तक लागले होते. अगदी छोटेसे, अगदी वीस-पंचवीस पानांचे.
“बघू कसले आहे”, असे म्हणत मिहीरने पुस्तक हातात घेतले आणि दोघे मिळून ते पुस्तक चाळू लागले. खरं तर त्या पुस्तकाची वरची दोन-चार पाने फाटली गेली होती. वरचे जे पान होते त्यावर ह, ळ, क्ष, ज्ञ ही मुळाक्षरे सुयोग्य चित्रांसह होती. नंतरची पाने उलटली तर एक ते शंभर अंक-संख्या होत्या. नंतरच्या पानावर तर चक्क दोन ते तीसपर्यंतचे पाढे होते.
पुस्तक चाळता चाळता मिहीर बोलला, “”अरे, ही तर अंकलिपी आहे. माझ्या आजोबांनी घेतली होती, मी लहान असताना.”
“”अंकांची आणि अक्षरांची ओळख आहे म्हणून अंकलिपी का?” “”हं, तसेच काहीसे असेल.”
“”अरे, पण किती जुनी झाली आहे, फाटली पण आहे, रद्दीत टाकायची का?” प्रणवने विचारले.
“”नको नको, एकतर माझ्या आजोबांची आठवण म्हणून ठेवली आहे ती मी. शिवाय नंतरची पाने बघ, त्यावर काय आहे ते”, मिहीर घाईघाईने बोलला.
प्रणवने पुढची पाने उलटली तर त्यावरही पाढ्यांसारखेच काही होते, पण ते काही त्याला वाचता येईना. अंकांपुढे छोट्या छोट्या रेघा ओढल्या होत्या. “”हे काय रे, मला तर वाचता देखील येत नाही”, प्रणवने उत्सुकतेने विचारले.
“”आपल्याला दोन ते तीसचे पाढे माहीत आहेत ना, तसेच हे अपूर्णांकांचे पाढे आहेत.”
तेवढ्यात मिहीरचे बाबा तेथे आले. ते म्हणाले, “”हे आहेत पावकी, निमकी, पाउणकी, सव्वाकी, दीडकी इत्यादींचे पाढे”.
“‘म्हणजे?” प्रणव चांगलाच गोंधळला होता.
“”प्रणव, तुला पाव म्हणजे काय माहीत आहे ना?”
“”हो, एक चतुर्थांश म्हणजेच एक छेद चार”.
“”पावच्या दुप्पट किती?”
“”अर्धा”
“”आणि तीन पट?”
“”पाऊण”
“”असेच तू करत गेलास की तुला मिळेल पावचा पाढा. पाव एके पाव, पाव दुने अर्धा, पाव त्रिक पाऊण, पाव चार एक आणि असेच पुढे त्याला म्हणतात पावकी. अर्ध्याचा पाढा म्हणजे निमकी, पाऊणचा पाढा म्हणजे पाऊणकी”
“”बापरे, तीस पर्यंतचे पाढे पाठ करता करता नाकी नऊ येते आणि हे कोण पाठ करणार?” प्रणव बोलला.
“”हो ना, बाबांनी मुद्दाम ही अंकलिपी माझ्यासाठी ठेवली होती. पण माझ्याच्याने काही ही पावकी, निमकी वगैरे पाठ नाही झाले”, मिहीरने सांगितले.
“”मला माहीत आहे, हे पाढे पाठ करायला थोडे वेगळे आहेत; पण यांचा अर्थ समजून घेतला, की मग सोपे जाईल”.
“”पण काका, कशाला पाठ करायला हवे एवढे अवघड काही?”
“”मला हे पाठ करायचे आहे, हे मनात पक्के करा. मग सोपे जाईल.” “”आम्ही नाही का पाठ केले, तुम्हालाही जमेल. आम्ही तर दोन ते तीस पर्यंतचे पाढे उलटे देखील पाठ केले होते. त्यामुळे गुणाकार, भागाकार तोंडी करणे खूप सोपे जाते. दुसरे म्हणजे कोणतीही नवीन गोष्ट शिकल्याने आणि वेगवेगळ्या प्रकारे विचार केल्याने मेंदू तल्लख राहतो.आणि शिवाय एकदा पावकी, निमकी वगैरे समजली, पाठ झाली की तोंडी अपूर्णांकांची गणिते सोडवणे, समजून घेणे सोपे जाईल.”
“”प्रणव, हे मात्र खरं बरं का, काहीही खरेदी केली की कॅल्क्युलेटरने उत्तर काढायच्या आधी बाबांचे तोंडी बील तयार असते. एकदम फास्ट.” “”चल तर मग मिहीर, हे पाठांतर आपण एक आव्हान म्हणून स्वीकारू.अन् लवकरात लवकर पाठ करून टाकू ही पावकी, निमकी…”
– विशाखा गंधे