सातारा – जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले. तालुकास्तरीय समित्या व पोलिस यंत्रणांनी सतर्क राहून बोगस डॉक्टरांचा शोध घ्यावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. अनधिकृत वैद्यकीय व्यवसायिकांवर कारवाई समितीची जिल्हास्तरीय बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. याप्रसंगी श्री. जयवंशी बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, डॉ. प्रमोद शिर्के, डॉ. भगवान मोहिते, डॉ. सुनील चव्हाण, डॉ. मिथुन पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक उपस्थित होते. बोगस डॉक्टरांना शोधण्यासाठी तालुकास्तरावर समित्या स्थापन केल्या आहेत.
बोगस डॉक्टरांनी अनेकदा चुकीचे उपचार केल्यामुळे रुग्णांच्या शरीरावर विपरित परिणाम होतो. काही रुग्णांना कायमचे अपंगत्व येते तर काही वेळा रुग्णांचा मृत्यू होण्याचीही शक्यता असते. अशा परिस्थितीत तालुकास्तरीय समित्या व पोलीस यंत्रणेने अधिक सक्षमपणे कामकाज करुन अधिकाधिक बोगस डॉक्टर शोधून काढले पाहिजेत. महाराष्ट्र वैद्यक व्यवसायी अधिनियमानुसार बोगस वैद्यकीय व्यवसाय करणे दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा आहे. बोगस डॉक्टर कोठे आढळून आल्यास प्रशासनास माहिती द्यावी, असे आवाहन रुचेश जयवंशी यांनी केले.
इलेक्ट्रोपॅथी किंवा इलेक्टोहोमिओपॅथी पदवी असणारे व्यावसायिक आपापल्या क्षेत्राशी संबंधित व्यवसाय करु शकतात. आपल्या परिसरात कोठे बोगस डॉक्टर वैद्यकीय व्यवसाय करत असेल तर संबंधित पोलीस ठाणे अथवा तालुका आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.