मुंबई -बाळासाहेब ठाकरे यांच्याइतकंच माझ्या मनात शरद पवारांचं स्थान आहे असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. कर्जत-जामखेड येथील पत्रकार संमेलनाला आज (दि. 7) खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद यांनी हजेरी लावली होती. यावेळी संजय राऊत यांची खास मुलाखत घेण्यात आली होती.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर रात्री संजय राऊत एक्सप्रेसवेने अचानक शरद पवारांना भेटायला गेले, असा दावा अनेक माध्यमांनी केला होता, तो कितपत खरा आहे? असा प्रश्न यावेळी संजय राऊत यांना विचारण्यात आला होता.
यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, आम्हाला रात्रीच्या काळोखात भेटण्याची गरज नाही. तश्या गाठीभेटी आम्ही घेत नाही. ना मला त्याची आवश्यकता आहे ना पवारांना. तसेच ते पुढे म्हणाले, माझ्या आयुष्यात मी बाळासाहेब ठाकरे यांच्याइतकंच शरद पवारांनाही स्थान देतो. मला बाळासाहेब ठाकरेंनी मोठं केलं, या क्षेत्रात उभं केलं. पण शरद पवार माझ्यासाठी आधारस्तंभ आहे.