रूपगंध: राजापूरची गंगा अर्थात सार्वजनिक नळ

जिनलाच्या बाजूला तलाची खोली अन नलातला सगला बुलबुलीत’ खरं तर हे वाक्‍य कुठून, कसे, का आले याचे उगमस्थान आजवर कोणालाच ठाऊक नाही, तरीही हे वाक्‍य उच्चारले गेले नाही अशी चाळ मुंबईत शोधूनही सापडणार नाही. चाळीत राहाणाऱ्यांना सार्वजनिक नळ म्हटलं की सगळ्यात आधी आठवते ते म्हणजे हेच वाक्‍य.

या वाक्‍याचा नळांशी अन्योन्य संबंध यायला बऱ्याच अंशी मुंबईतील चाळीत कोकणातल्या विशिष्ठ प्रांतातील लोक जबाबदार आहेत. या प्रांतातून मुंबईत आलेले बरेचसे पुरुष तेव्हा मुंबईत घरगडी म्हणून काम करत असत. ही मंडळी सहसा आपला कुटुंब कबिला गावी ठेवून एकटेच मुंबईत राहत असत.

चाळीत साधारण सुखवस्तू असलेल्या कुटुंबांची भांडी करून त्यातल्याच एखाद्या घरी आपली जेवणाची सोय करीत असत. या सडाफटिंग माणसाला रात्री झोपायला व्हरांडा, जिना, पटांगण अशी कोणतीही वळचणीची जागा चालत असे. दिवसभरात सार्वजनिक नळांचा आणि त्यांचा अनेकदा संबंध येत असे. त्यांच्या बोलीभाषेत “ळ’ अक्षराचा उच्चार “ल’ असा होतो. कदाचित त्यांना चिडवण्याच्या कारणाने या वाक्‍याचा संबंध सार्वजनिक नळाशी जोडला गेला असावा.

सार्वजनिक नळ हा चाळ संस्कृतीचा एक अविभाज्य भाग. खरेतर या सार्वजनिक नळावर एक अख्खी कादंबरी होऊ शकेल अशी याची ख्याती आहे. तरीही अगदी थोडक्‍यात याची ओळख करून देण्याची अवघड कसरत मला आज करावी लागणार आहे.

चाळीच्या रचनेप्रमाणे या सार्वजनिक नळांचे प्रत्येक चाळीतले स्थान बदलत होते. कधी जिन्यासमोर तर कधी जिन्याच्या मागे, तर कधी अगदीच स्वतंत्र असे अस्तित्व नळाला लाभत असे. पण सर्वसाधारणपणे बऱ्याचशा चाळीत सार्वजनिक शौचालय आणि सार्वजनिक नळ हातात हात घालून एकमेकांच्या समोरच असत. शौचालयाला भासणारी पाण्याची गरज या दोघांना एकत्र बांधून ठेवत होती.

मुंबई त्याकाळी नुकतेच बाळसे धरत होती. गावावरून आलेल्या मंडळींच्या गावात अंगी भिनलेल्या सवयी तशा बदललेल्या नव्हत्या. गावाकडे घरात काटकसरीने पाणी वापरायची सवय असलेल्या या मंडळींची पाण्याची खरी गरज स्वयंपाक व स्वयंपाकाची भांडी धुणे एवढीच होती. बाकी सारी कामे सकाळी नळाला पाणी असताना उरकून टाकली जात.

त्यामुळे घरात नळ असणे ही तितकीशी अत्यावश्‍यक बाब कोणालाच वाटत नव्हती आणि तसे पाहिले तर त्याकाळात घरात नळ असणे हे एक सामाजिक प्रतिष्ठेचे लक्षण होते. अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच लोकांच्या घरी स्वत:चे नळ होते. बाकीच्यांना रोजच्या वापराच्या पाण्यासाठी या सार्वजनिक नळावर अवलंबून राहावे लागत होते. दिवसभरासाठी लागणारे पिण्याचे, स्वयंपाकाचे, भांडी धुण्यासाठी लागणारे पाणी या नळांवरून भरले जात असे.

कपड्यांचे धुणे सकाळी नळ असताना आटोपून घेतले जात असे. त्यातून चुकून एखादा कपडा धुवायचा राहिला तर त्याला दुसऱ्या दिवशीच पाणी लागत असे. घरात असलेल्या मोरीचा उपयोग समस्त स्त्रीवर्ग आपल्या अंघोळीसाठी करत असला, तरी पुरुष वर्गाला अंघोळीसाठी पूर्णपणे या नळावरच अवलंबून राहावे लागत होते.

सार्वजनिक नळांवर एकापेक्षा जास्त नळ असत त्यापैकी एक नळ हा समस्त पुरुष मंडळींच्या दिमतीला सोडलेला असे. याच नळावर बैठकीच्या गाळ्यातली मंडळी आणि इतर पुरुष वर्ग आपले सर्व कार्यक्रम उरकत असत. मात्र इतर नळांवर स्त्रीवर्गाचा जन्मसिद्ध हक्‍क होता. या हक्‍कावर केलेले कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण त्याही जमान्यात स्त्री वर्गाकडून सहन केले जात नव्हते. थोडक्‍यात ही अबला मुळातच सबला होती याचे हे जिवंत उदाहरण आहे.

दिवसभर पाण्याचा थेंबही न देणारा नळ, भल्या पहाटेपासून “राजापूरच्या गंगे’सारखा वाहायला लागे. साधारण तीन ते चार तास नळातून ही “राजापूरची गंगा’ अखंड वाहत असे. पहाटे “नळ येण्या’च्या वेळेच्या आधीपासूनच या नळावर लगबग सुरू होई. समस्त स्त्रीवर्ग नळ येण्यापूर्वी आपापली भांडी नळासमोर एका लाईनीत मांडून ठेवीत असे.

लढाईला जाणारा योद्धा युद्धावर जाण्यापूर्वी ज्याप्रमाणे आपापली शस्त्रे परजतात, तेवढ्याच किंबहुना त्यापेक्षा अधिक तन्मयतेने चाळीतल्या स्त्रिया आपल्या मुखरूपी शस्त्राला “मशेरी’ नावाच्या वंगणाने “परजत’ शिळोप्याच्या गप्पा मारत नळासमोरच उभ्या राहत. उभ्याउभ्या एकमेकींची चेष्टा मस्करी करणे. चाळीत चालणाऱ्या नवीन लफड्यांचे कुजबूज करत चर्वितचर्वण करणे हा नळ येण्यापूर्वीचा प्रमुख कार्यक्रम असे.

अनुपस्थित असलेल्या स्त्रीबद्दलच्या गप्पा सुरू झाल्या की सगळ्या रागिणी एकमेकांच्या गळ्यात पडत आणि “मी सांगितले असे कोणाला सांगणार नसशील तर सांगते बाई’ असा उत्तराची अपेक्षा नसलेला प्रश्‍न विचारून त्या स्त्रीबद्दल वाऱ्यापेक्षाही जास्त वेगाने पसरणाऱ्या बातमीची “ब्रेकिंग न्यूज’ तिथे लिक करत.

इतक्‍या प्रेमळ गप्पा मारणाऱ्या या स्त्रियांकडे पाहिले तर आपापसात यांचे खूप जिव्हाळ्याचे संबंध आहेत हा भास प्रत्येकालाच होई. कोणत्याही क्षणी त्यांना प्रेमाचा उमाळा येईल आणि एकमेकींच्या गळ्यात पडतील, असे चित्र प्रत्येक नळावर दिसत असे. पण हा त्यांचा समंजसपणा केवळ नळातून पाण्याचा पहिला थेंब पडेपर्यंतच चालत असे.

नळातून पाण्याचे दर्शन होईपर्यंत एकमेकींच्या गळ्यात गळा घालणाऱ्या या बायका पाण्याची धार भांड्यात पडताच रणचंडिकेचा अवतार धारण करीत असत. पाणी भरण्याच्या नंबरावरून होणाऱ्या भांडणात अक्षरश: हातापाईही होत असे. रोजच्या रोज नळावर होणारी ही जुगलबंदी अर्थात फुकटचे होणारे मनोरंजन, पाहणाऱ्याला दिवसभराचे ताणतणाव विसरायला मदत करत.
मात्र नळावर होणाऱ्या या बाचाबाचीची एक खाशी गंमत होती.

ही बाचाबाची केवळ आणि केवळ नळ असे पर्यंतच असे. एकदा का नळ गेले की घरच्या कामाला जुंपलेल्या बायकांना लागणाऱ्या हरएक मदतीसाठी या शेजारणीचीच मदत होत असे. सकाळच्या कामाच्या ऐन धामधुमीत घरात संपलेली साखर, चहा पत्ती, तेल, मीठ अशा तातडीने लागणाऱ्या वस्तू विनाविलंब मिळण्याची हक्‍काची जागा म्हणजे शेजारची “रमेश’ची नाहीतर “संगीता’ची आईच असे. एकतर दुकानात कोणाला धाडून ती वस्तू हातात मिळेपर्यंत चहाची किंवा डब्यांच्या भाजीसाठी लागणाऱ्या तेलाची वेळ निघून गेलेली असे. शिवाय वेळ थांबवली तरी दुकानात जायचे कोणी हा यक्षप्रश्‍न अनुत्तरीतच राहत असे.

– डॉ. नरेंद्र कदम

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.