कोरोनाची भीती अन् महापुराची धास्ती..! पूरग्रस्त कुटुंबाने घेतला ट्रकचा आधार

– विनोद मोहिते 

इस्लामपूर – एकीकडे कोविडची भीती आणि दुसरी कडे महापूराची धास्ती अशा अवस्थेत नदीकाठच्या लोकांना स्थलांतरित व्हावे लागत आहे. आज शनिवारी पावसाने उघडीप दिली असली तरी कोयना धरणातील पाणी सोडल्याने पाणी पातळी स्थिरचं आहे. 

शनिवारी बोरगाव येथील पेट्रोल पंप परिसरात कोरोनाच्या भीतीने आणि महापुराची धास्तीने मसुचीवाडी येथील पांडुरंग व दशरथ गावडे कुटुंबाने चक्क ट्रक मध्ये संसार थाटाने पसंद केले आहे.

शनिवारी पहाटे तीन वाजता हे गावडे कुटुंब गावात पाणी आल्याने गावाबाहेर पडले. कर्नाटकातून आलेले हे कुटुंब वाळवा तालुक्यातील मसुचीवाडीत अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे. तात्पुरत्या पत्र्याच्या शेड मध्ये राहताना त्या घरातही पाणी शिरले.

लहान मुलांबाळासह जनावरे घेऊन बोरगाव येथे पाण्यातून वाट काढत स्वतःच्या ट्रक सह बाहेर पडले आहे. त्यांनी पेट्रोल पंप आवारात ट्रक थांबवून पाणी कमी होण्याची वाट पाहणे पसंत केले आहे.

पश्चिम महाराष्ट्रात तसा वाळवा तालुका सधन तालुका. इथं वारणा आणि कृष्णा नदीने संपन्नता आणली आहे. शेती व्यवसायात ऊस हे मुख्य पीक घेतले जाते. नदीकाठी असणारे शेतकरी सातत्याने येणाऱ्या पुराने बेजार झाले आहेत.

दोन वर्षांपूर्वी आलेल्या पुराच्या संकटातून सावरण्याआधी आतां कोरोनाने दीड वर्षात प्रचंड नुकसान झाले आहे. कोरोना कमी होण्यापेक्षा तो वाढतच आहे. त्यात निसर्गाने पुन्हा पुराच्या रूपाने घाला घातला आहे.

तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या चिंताजनक असतानाच महापुराचे नैसर्गीक संकट भयभीत करणारे आहे.महापुर कोरोना आणि पुन्हां आता महापुर यामुळे नागरीकांचे जनजीवन पुर्णता: विस्कळीत झाले आहे.

शासन व प्रशासन कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. पण हे प्रयत्न अपुरे पडत आहेत. कोरोना रुग्ण संख्या वाढत असताना महापुराच्या पाण्याने अनेक गावांना वेढा दिला आहे. याच कृष्णा काठच्या गावात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत.

पाणी आल्याने पूरग्रस्त भागांतील अनेकांनी स्थलांतर केले आहे. काहींनी इस्लामपूर शहरातील निवारा केंद्रात आसरा घेतला आहे. वारणा व कृष्णा नदीच्या काठावरील वाळवा तालुक्यातील २९ हून अधिक गावे बाधित झाली आहेत.

या गावातील सुमारे वीस हजार नागरिकांनी स्थलांतर केले आहे. २००५ , २०१९ आणि यंदाच्या महापूराच्या संकटाने बेजार झालेल्या अनेक कुटुंबांनी आपली संसारोपयोगी साहित्य घेऊन निवारा केंद्रात मुक्काम ठोकला आहे.

अनेक नागरिकांनी जवळच्या नातेवाईकांकडे जाण्याचा मार्ग पत्करला. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी संकटात असणाऱ्या घरात घेताना सावधगिरीची भूमिका घेतली. खरतर सध्या सर्वाधिक कोरनाचे रुग्ण तालुक्यात आहेत.

ज्या गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आहेत त्याच गावांमधील अनेक नागरिकांना स्थलांतर करावे लागले आहे. अशा परिस्थितीत एकीकडे कोरोनाची भीती आणि दुसरीकडे महापुराच्या संकटात कृष्णाकाठ सापडल्याचे दिसून येत आहे.

निवारा केंद्रांमध्ये असणाऱ्या नागरिकांची कोविड तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. दक्षता घेणे हाच मार्ग उरला आहे. आतां सर्व स्थलांतरित पूरग्रस्त पूर ओसरण्याच्या प्रतिक्षेत आहेत.

पांडुरंग गावडे म्हणाले, “आम्ही मिळले ते काम करून गुजरान करतो. महापूराने आम्ही स्थलांतरित झालो. कोरोनाचा काळ असल्याने आम्ही दोन भावांची कुटुंबातील लहान मुलांसह सर्वजण ट्रक मध्ये राहणे पसंत केले आहे. आम्ही सुरुखप आहोत. पाणी कमी झाल्यावर पुन्हा गावाकडे जाऊ.”

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.