रूपगंध: सहप्रवासी

प्रवास केल्याने माणूस अधिक सक्षम होतो. त्याला विविध अनुभव मिळतात, माणसे भेटतात, निसर्गाचे सान्निध्य मिळते. अडचणींवर मात करण्याची जिद्द मिळते. त्यामुळे आणि रोजच्या जीवनात बदल म्हणून आपण प्रवास करत असतो.

प्रवासासाठी बस, रेल्वे हे पर्याय उत्तम आहेत. याशिवाय स्वतःच्या गाडीतून प्रवास करण्याचा आनंद वेगळाच. विमान प्रवासही आता सहज शक्‍य झाला आहे. वाहन कोणतेही असू दे, प्रवासात आपली जवळची व्यक्‍तीबरोबर असेल तर फारच छान.

मित्रमैत्रिणी समवेत केलेले प्रवास म्हणजे दे धमाल. प्रवास करताना काही जरुरीचे सामान आपण नेहमीच बरोबर घेतो. पण विशेषतः बस, रेल्वे किंवा अगदी विमानातसुद्धा आपल्या शेजारी कोण बसणार आहे, याची आपल्याला कल्पना नसते.

रेल्वेच्या प्रवासात ज्या बोगीमध्ये आपण तिकीट आरक्षित करतो, तिथेच अनेकांनी ही जागा आरक्षित केलेली असते. गाडी सुरू झाल्यावर हळूहळू आपण इकडे तिकडे बघत याचा अंदाज घेतो. त्यातून पुणे-मुंबई सारखा तीन साडेतीन तासांचा प्रवास असेल तर फार फरक पडत नाही. पण लांबचा प्रवास असेल, तर हे सहप्रवासी आपण बघतोच.

एखादा तरुण मुलगा हेडफोन लावून काही तरी ऐकत बसलेला असतो. त्याला शेजारी बसलेल्या व्यक्‍तीशी काहीही देणे घेणे नसते. एखादे मध्यमवयीन जोडपे जरा मोकळीक मिळाली म्हणून फिरायला बाहेर पडलेले असते. एखादी ज्येष्ठ स्त्री सुनेच्या किंवा मुलीच्या बाळंतपणासाठी निघालेली असते. तर एखादे वयस्कर जोडपे मुलाकडून निघून परत आपल्या घरी निघालेले असते. कुणी नवीन नोकरी निमित्त, कुणी लग्न ठरलं म्हणून, तर कुणी कुणाकडे दुःखद घटना घडली म्हणून भेटायला निघालेले. प्रत्येकाचे प्रवास करण्याचे कारण निराळे.

या एकाच डब्यात असे विविध कारणांसाठी प्रवास करणारे त्यांच्या आयुष्यातील काही तास एकत्र आलेले असतात. संपूर्ण गाडीत तर किती विविधता असते. जो तो आपल्या जागेवर बसलेला पण सर्वांना एकत्र नेणारी ती गाडी एक. आपापले स्टेशन आले की, उतारू उतरून जातात. पुन्हा तेथे नवीन लोक चढतात. प्रवास सुरूच राहतो. गाडी चालूच राहते. ती बघत नाही की कोण उतरले, नवीन कोण आले.

बस किंवा विमानातही थोडे फार असेच होते. बसमध्ये फक्‍त संख्या कमी असते. लोक चढतात, उतरतात. तिकीट काढतात. शेजारी येऊन बसतात. विमानात शेजारी, पलीकडे कुणीही असले तरी संभाषण फारसे होत नाही. जो तो आपापला प्रवासी असतो. सहप्रवासी नसतो.
प्रवास कोणत्याही साधनातून होवो, तो आपल्याला आनंद देतो, तर कधी क्‍वचितच मनस्तापही. हेच सूत्र आपल्या जीवनालाही लागू आहे.

जन्माला आल्यापासून, अगदी शेवटच्या श्‍वासापर्यंतचा प्रवासही आपण असाच करतो. अनेक सहप्रवासी येथेही भेटतात. काही मनात घर करून राहतात, तर काहींची आठवणही नकोशी असते. काही मध्येच उतरून जातात. त्यांच्या आठवणीत आपण राहतो. पण हा जीवनप्रवास चालूच राहतो. सहप्रवासी भेटतच राहतात. गाडी चालत राहते. मुक्‍कामी पोहचे पर्यंत…

-आरती मोने

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.