मेष : या सप्ताहात ग्रहांची साथ मिळेल. व्यवसायात पैशाअभावी थांबून राहिलेली कामे मार्गी लागतील. हातातील पैशाचा विनियोग विचारपूर्वक करावा. हितचिंतकांची साथं कामात मिळेल. नवीन कामे मिळतील. नोकरीत कामानिमित्ताने जादा सवलती मिळतील त्याचा लाभ घ्या. सहकारी व वरिष्ठांची कामात मदत मिळेल. जोडधंद्यातून विशेष लाभ होतील. घरात वातावरण खेळीमेळीचे राहील. अर्धवट राहिलेली कामे पूर्ण होतील. तरुणांना नजरेच्या टप्प्यात यश मिळेल.
वृषभ : मनातील बेत प्रत्यक्षात कृतीत आणण्याचा निर्धार करा. व्यवसायात नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. खेळत्या भांडवलाची सोय होईल. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. प्रवासयोग संभवतो. नोकरीत सहकारी व वरिष्ठांना कामात तुमचा सल्ला महत्त्वाचा वाटेल. तुमची प्रतिष्ठा उंचावेल. जोडधंदा करणाऱ्यांना त्यातून फायदा मिळेल. घरात प्रियजनांच्या भेटीने वातावरण आनंदी राहील. तरुणांनी आत्मविश्वासाने पुढे जावे. महिलांना प्रोत्साहनाची गरज भासेल.
मिथुन : प्रगतीला पूरक वातावरण व ग्रहमान लाभले आहे. त्याचा लाभ घ्या. व्यवसायात विनाकारण रेंगाळलेली कामे हाती घेऊन मार्गी लावा. तांत्रिक अडथळ्यांवर मात करून कामाची पद्धत बदलून उलाढाल वाढवा. नवीन करारमदार होतील. नोकरीत कष्टाच्या प्रमाणात यश मिळेल तुमचे महत्व वाढेल. बेकार व्यक्तींना चांगल्या संधी चालून येतील. पैशाची तजवीज होईल. घरात सुवार्ता कळेल. महिलांना आवडत्या छंदात वेळ घालवता येईल.
कर्क : परिस्थितीनुरुप बदल करा व ध्येयधोरणे ठरवा. धंदा व्यवसायात तुमचा हुरुप चांगला असेल. कामे आटोक्यात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करा. जुनी येणी वसुलीवर लक्ष केंद्रित करा. नोकरीत कामात चोख रहाल. हातून चुका होणार नाहीत याकडे लक्ष द्या. ऐकीव गोष्टींवर विश्वास न ठेवता शहानिशा करा. घरात कामाची आखणी करून त्यानुसार प्राधान्य द्याल व कामाचा उरक पाडाल. मुलांकडून चांगली बातमी कळेल. प्रियजनांच्या सहवासात वेळ मजेत जाईल.
सिंह : स्वयंसिद्ध राहून कामे कराल त्याचा फायदा होईल. व्यवसायात काही ठोस पावले उचलून कामांना गती द्याल. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कार्यपद्धतीत बदल करावे लागेल. पूर्वीचे हितसंबंध संपून नवीन हितसंबंध जोडले जातील. नोकरीतील काही प्रश्न सुटतील. काहींना नवीन नोकरी मिळेल. केलेल्या कामाचे समाधान मिळेल. घरात महिलांनी कुणाकडून कुठलीही अपेक्षा ठेवू नये. सामंजस्याने वैचारिक मतभेद मिटतील.
कन्या : कामाचे नियोजन करून त्याप्रमाणे कृती करा. दुसऱ्यांवर फारसे अवलंबून राहू नका. व्यवसायात हातीतील कामांवर लक्ष ठेवा. भागीदारीच्या प्रकृतीची काळजी घ्या. कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना ज्येष्ठांचा सल्ला घ्या. पैशाचे व्यवहारात चोख राहा. घरात महिलांना कामाचा ताण पडेल. तणावाचे वातावरण राहील. परंतु बोलून वाईट होण्यापेक्षा शांत रहा. तरुणांनी अतिविश्वास टाळावा. विचार व कृती यांचा समन्वय साधावा.
तुळ : कामात म्हणावी तशी प्रगती नाही. त्यामुळे निराशा येईल. थोडी सबुरी ठेवलीत तर यश मिळेल. व्यवसायात महत्त्वाची कामे होतील. खेळत्या भांडवलाची गरज भासेल. हितचिंतकांची मदत मिळेल. भावनेच्या भरात मात्र मोठी उडी घेऊ नका. वेळ व काळाचे भान ठेवून कामे उरका. नोकरीत वरिष्ठांच्या पुढे पुढे न करता कुवत ओळखून कामे स्विकारा. गोड बोलून खुबीने सहकाऱ्यांकडून कामे करून घ्या. महिलांनी रागांवर नियंत्रण ठेवावे.
वृश्चिक : घर व व्यवसाय दोन्हीकडे लक्ष द्यावे लागेल. त्यामुळे तारेवरची कसरत करावी लागेल. व्यवसायात कामात आलेला विस्कळीतपणा कमी होईल. कामात कर्तव्य व आनंद दोन्हीचा उपभोग घेता येईल. आर्थिक आवक सुधारेल नोकरीत निश्चय पक्का असेल तर यश मिळणारच. प्रगतीचा मार्ग अवघड असला तरीही त्यासाठी केलेल्या प्रयत्नात आनंद मिळेल. ओळखीचा उपयोग होईल. महिलांचे घरात जास्त पैसे खर्च होतील.
धनु : जादूची कांडी फिरावी व विस्कटलेली घडी सुरळित व्हावी अशी तुमची इच्छा असेल परंतु थोडा धीर धरलात तर बरेचसे प्रश्न सुकर होतील. व्यवसायात विचारपूर्वक निर्णय घेऊन कामाची आखणी करा. यशासाठी थोडी वाट पहावी लागेल. काही प्रश्नांना चालना मिळेल. नोकरीत वरिष्ठ व सहकारी यांच्याकडून मदतीची अपेक्षा नको. कामात अडीअडचणी आणण्याचा ते प्रयत्न करतील. त्यातून तुम्ही तुमची सुटका करून घ्याल. घरात तुमचा आग्रही स्वभाव राहील.
मकर : कष्टाच्या प्रमाणात यश मिळवून देणारे ग्रहमान आहे. व्यवसायात पैशासंबंधीच्या व्यवहारांना प्राधान्य द्या. व्यवसायात कामात झालेला विलंब तुम्हाला सहन होणार नाही. नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. ती हाती घेण्यापूर्वी त्यातील त्रुटींचा अभ्यास करा व्यवहारी दृष्टिकोन ठेवून कामे करा. महत्त्वाचे निर्णय घेताना निष्णात व्यक्तींचा सल्ला घ्या. नोकरीत प्रत्येक पाऊल सावधतेने टाका. बोलण्यातून होणारे गैरसमज टाळा. पैशाचा अपव्यय टाळा. विचारपूर्वक निर्णय घा.
कुंभ : “हाती घ्याल ते तडीस न्याल’ विचार स्वातंत्र्य मिळेल. व्यवसायात आवश्यक ते बदल करून उलाढाल वाढवा. तडजोडीचे धोरण स्वीकारून कामात लवचिकता आणा. प्रगती होईल. नोकरीत कामात गुप्तता राखा. स्वत:च्या उन्नतीसाठी हालचाली कराल त्यात यश येईल. पैशाचा मोह होईल. परंतु अव्यवहाराने वागू नका. घरात तुमच्या विचित्र वागण्याचा इतर व्यक्ती वेगळाच कयास साधतील, दुर्लक्ष करा. वागण्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. महिलांनी स्वत:चे छंद जोपासावेत.
मीन : मूड बदलायला तुम्हाला वेळ लागत नाही तेव्हा सारासार विचार करा मगच कृती करा. व्यवसायात मृगजळाच्या पाठीमागे न धावता हाती असलेल्या कामांना प्राधान्य द्या. नवीन योजना तुमच्या दृष्टीक्षेपात असतील. हाती असलेल्या पैशाचा वापर जपून करा. नोकरीत हलक्या कानाने निर्णय घेऊ नयेत. मनाला पटेल, रुजेल तेच निर्णय घ्या व त्याप्रमाणे वागा. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. घरातील महिलांनी स्वयंसिद्ध राहावे. आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. प्रकृती उत्तम राहील.