“ए, तुला कापूस कोंड्याची गोष्ट सांगू?’
“कापूसकोंड्याची?’
“कापूसकोंड्याची म्हणून का विचारतो? तुला कापूसकोंड्याची गोष्ट सांगू का?’
“ए गप्प रे.’
“ए गप्प रे काय म्हणतोस! तुला कापूसकोंड्याची गोष्ट सांगू का?’
“अरे चिंट्या, तू ना प्रणवदादाला उत्तरच देऊ नकोस. तो तर तुला न संपणारी गोष्ट सांगतो आहे.’
“म्हणजे मिहीरदादा त्या चिमणीसारखी?’
“कोणती रे?’
“एक चिमणी येते, एक दाणा उचलते, भुर्र उडते… दुसरी चिमणी येते अजून एक दाणा उचलते, भुर्र उडते…’
“ही गोष्ट पण ना संपतच नाही.’
“चिंटू, तू कधी आकाशातल्या चांदण्या मोजल्या आहेत का?’ मिहीरने विचारले.
“हो. पण चांदण्या मोजता मोजता कधी झोप लागते कळतच नाही. आणि चांदण्या काही मोजूनच होत नाहीत.’
“प्रणव, इतका वेळ तू चिंटूला त्रास देत होतास ना! सांग की आता अशा न मोजता येणाऱ्या संख्येला काय म्हणतात ते?’ मिहीरने विचारले.
“अनंत. न मोजता येणाऱ्या संख्यांना “अनंत’ असे म्हणतात. आणखी काय विचारायचे आहे तुला मिहीर?’
“अजून अशी काही उदाहरणे सांग की मला.’
“रेषा. जी दोन्ही बाजूंना अमर्यादित असते. आणि रेषा ही असंख्य बिंदू जोडून तयार होत असते. म्हणजेच रेषेवर अनंत बिंदू आहेत.’
“अरे व्वा प्रणव. बरं आता झटपट फेरी. आहेस का तयार?’
“एका पायावर. विचार काय विचारायचे ते.’
“दे मग माझ्या प्रश्नांची उत्तरे. अनंत संख्येत कोणतीही एखादी संख्या मिळवली तर?’
“उत्तर अनंत संख्या.’
“अनंत संख्येतून कोणतीही संख्या वजा केली तर?’
“उत्तर अनंत संख्या.’
“अनंत संख्येला कोणत्याही संख्येने गुणले तर?’
“उत्तर अनंत संख्या.’
“आणि जर अनंत संख्येला कोणत्याही संख्येने भाग दिला तर?’
“उत्तर अनंत संख्या.’
“व्वा! प्रणव दादा. एकदम भारी आहेस तू. चिंटू तर प्रणवने झटपट उत्तरे दिल्याने खूश झाला होता.’
“मिहीर आता मी तुला एक कोडे घालतो. दे तू उत्तर. एक ससा आहे.त्याची उड्या मारायची एक सवय आहे. पहिली उडी तो दोन मीटर लांब मारतो. पण नंतरची प्रत्येक उडी आधीपेक्षा अर्ध्या अंतरावर जाते.’
“म्हणजे तुला असे म्हणायचे का, की पहिली उडी दोन मीटर अंतरावर,दुसरी उडी एक मीटर अंतरावर तर तिसरी उडी अर्ध्या मीटरवर असेल?’ मिहीरने विचारले.
“एकदम बरोबर कळले की मिहीर तुला. पण माझे कोडे आता या नंतर आहे.’
सशाला जर चार मीटर अंतर जायचे असेल तर त्याला किती उड्या माराव्या लागतील?’
“त्यात काय अवघड आहे? तीन उड्यांमध्येच तर साडेतीन मीटर अंतर तुझा ससा गेला आहे. राहिला फक्त अर्ध्या मीटर अंतरचा प्रश्न. आत्ता सांगतो तुला उत्तर.’
“हां! हां! काढ तू उत्तर. तोपर्यंत मी चिंटूसोबत खेळतो.’ चल रे चिंट्या म्हणत प्रणव तर गेला. आणि इकडे मिहीर बसला हातात कागद पेन घेऊन.का म्हणून का विचारता? तुम्ही पण उत्तर शोधायचा प्रयत्न करा मग कळेल!
– विशाखा गंधे