रोहितचा द्विशतकी धमाका, रहाणेचेही शतक

भारत 9 बाद 497 घोषित, दक्षिण आफ्रिका 2 बाद 9

रांची: सलामीवीर रोहित शर्माचे पहिले कसोटी द्विशतक आणि अजिंक्‍य रहाणेचे दमदार शतक यांच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात आपला पहिलाडाव 9 बाद 497 धावांवर घोषित केला. अंधुक प्रकाशामुळे आज दुसऱ्या दिवसाचाही खेळ लवकर थांबविण्याला त्यावेळी दक्षिण आफ्रिकेची 2 बाद 9 अशी केवीलवाणी अवस्था झाली आहे. दक्षिण आफ्रिका संघ आता 488 धावांनी पिछाडीवर असुन पुण्यातील कसोटी पाठोपाठ याही सामन्यात त्यांना पुन्हा एकदा फॉलोऑनची नामुष्की टाळण्याचे आव्हान राहणार आहे. केशव महाराज आणि एडन मार्करम यांच्या दुखापतीमुळे नवोदितांना स्थान देण्यात आल्यानंतर आता कर्णधार फाफ डुप्लेसीलाच संघाचा डाव सावरावा लागणार आहे.

या मालिकेत प्रथमच सलामीवीराच्या भुमीकेत असलेल्या रोहितने निवडसमितीचा विश्‍वास सार्थ ठरविताना कसोटी क्रिकेटमधील आपले पहिलेच द्विशतक साकार केले. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या सगळ्याच गोलंदाजांवर वर्चस्व राखताना रहाणेसह चौथ्या गड्यासाठी विक्रमी द्विशतकी (267) भागीदारी करत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली.

शनिवारी शतक पुर्ण केल्यानंतर आज मैदानात उतरलेल्या रोहितने सकाळची पहिली काही षटके सावध फलंदाजी केली आणि नंतर मात्र पाहुण्यांच्या गोलंदाजीवर हल्ला केला. त्याने या मालिकेत तिसऱ्यांदा दीडशतकी मजल मारताना कसोटीतील अपयशी फलंदाज असा शिक्का पुसुन काढला. त्यानंतर देखील त्याने रहाणेसह वेगाने धावा जमविताना कारकिर्दीतील पहिले द्विशतक पुर्ण केले. रोहितने या कसोटी मालिकेत प्रथमच सलामीवीराच्या भुमीकेत प्रचंड यशस्वी कामगिरी केली आहे. विशाखापट्टणम कसोटीत दोन्ही डावात शतकी खेळी केलेल्या रोहितने या मालिकेत आत्तापर्यंत 529 धावा फटकावल्या आहेत. एकाच मालिकेत पाचशेपेक्षा जास्त धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये रोहितने पाचवे स्थान मिळविले आहे.

रहाणेने देखील रोहितच्या साथीत संघाला पाचशे धावसंख्येच्या जवळ आणले. रहाणे बाद झाल्यानंतर फलंदाजी क्रमात बढती मिळालेल्या रवींद्र जडेजाने रोहितला सुरेख साथ देताना वेगाने धावा जमविल्या. त्यानेही वाहत्या पाण्यात हात धुवुन घेत अर्धशतकी खेळी केली. त्याने रोहितसह पाचव्या गड्यासाठी 64 धावांची भागीदारी केली. रोहित बाद झाल्यावर यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाने जडेजाला साथ देत सहाव्या गड्यशासाठी 47 धावांची भागीदारी करताना संघाला चारशेचा टप्पा गाठुन दिला.

साहा बाद झाल्यावर जडेजाने रवीचंद्रन अश्‍विनसह 37 धावा जोडताना संघाच्या साडेचारशे धावा फलकावर लावल्या. त्यानंतर भारतीय फलंदाजांनी दांडपट्टाच फिरवायला सुरूवात केली. उमेश यादवने केवळ 10 चेंडुत पाच षटकारांची फटकेबाजी करत 31 धावांची खेळी केली. दिवसातील उर्वरित वेळात आणखी काही षटके फलंदाजी करण्यापेक्षा क्षेत्ररक्षण करून दमलेल्या दक्षिण आफ्रिकेलाच फलंदाजी करायला लावण्याचा कोहलीचा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरविला. या मालिकेत भारताच्या गोलंदाजीवर बेजबाबदार फटके मारून बाद होण्याची परंपरा याही सामन्यात पाहुण्यांनी कायम ठेवली. महंमद शमीने त्यांच्या डावातील पहिल्याच षटकात दुसऱ्याच चेंडुवर भरात असलेल्या डीन एल्गरला बाद करत पहिला झटका दिला.

यष्टिमागे साहाने एल्गरचा अप्रतिम झेल घेतला. त्यानंतर उमेश यादवने डावाच्या दुसऱ्या व आपल्या पहिल्याच षटकात दक्षिण आफ्रिकेला पुन्हा धक्का दिला. त्याने धोकादायक कॉंटन डिकॉकला साहाकरवी झेलबाद केले. त्याचवेळी अंधुक प्रकाश असल्याचे रीचर्ड इलिंगवर्थ आणि नायजेल लॉंग या मैदानावरील पंचांना लक्षात आले आणि त्यांनी खेळ थांबविण्याचा निर्णय घेतला. त्यापुर्वी आज कोहलीने दुखापतग्रस्त कुलदीप यादवच्या एवजी डावखुरा फिरकी गोलंदाज शाहबाज नदिमला कसोटी पदार्पणाची संधी दिली. त्याने आज दोन षटकांची गोलंदाजी करताना खेळपट्टी फिरकीला साथ देत असल्याची साक्ष दिली. आज संघात बदल करताना कोहलीने वेगवान गोलंदाज इशांत शर्माला विश्रांती देत नदिमला संधी दिली. खरेतर या सामन्यात कुलदीपला खेळविण्यासाठी तो आग्रही होता मात्र सरावादरम्यान कुलदीपच्या खांद्याला दुखापत झाली आणि त्याच्या जागी नदिमची निवड केली. 9 गडी बाद झाल्यावर 497 धावासंख्येवर कर्णधार विराट कोहलीने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला.

रोहित-रहाणेची विक्रमी भागीदारी

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या अखेरच्या तिसर्या कसोटी सामन्यावरही आपले वर्चस्व राखले आहे. सलामीवीर रोहित शर्मा आणि अजिंक्‍य रहाणे यांनी केलेल्या शतकी खेळाच्या जोरावर भारताने 300 धावांचा टप्पा पार केला. नाणेफेक जिंकून कर्णधार विराट कोहलीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र भारताने पहिले 3 फलंदाज लवकर गमावल्यामुळे संघाची सुरुवात संथ झाली. त्यानंतर मात्र रोहितने मुंबईकर साथीदार अजिंक्‍य रहाणेसोबत द्विशतकी भागीदारी रचली.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीमध्ये सर्वोत्तम भागीदारी

  • मयांक अग्रवाल – रोहित शर्मा – (2019) 317 धावा
  • राहुल द्रविड – विरेंद्र सेहवाग – (2008) – 268 धावा
  • रोहित शर्मा – अजिंक्‍य रहाणे – (2019) – 267 धावा
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)