रोहित-ईशांत; पळा पळा रे विमान पकडा…

रवी शास्त्री यांच्या वक्तव्याने गडबड

नवी दिल्ली  – बेंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आपल्या दुखापतींवर उपचार घेत असलेल्या आणि फिटनेस टेस्ट देत असलेल्या रोहित शर्मा आणि ईशांत शर्मा जर दोन-तीन दिवसांत ऑस्ट्रेलियात पोहोचू शकले नाहीत, तर त्यांचा संघात समावेश अवघड होऊ शकतो; कारण या दोघांना तिथे पोहोचल्यानंतर क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. हे पाहता आता रोहित आणि ईशांतवर “पळा, पळा रे विमान पकडा…’ अशी वेळ आल्याचे स्पष्ट झाले आहे.

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर दाखल झाला असून येत्या 27 तारखेला वनडे मालिकेने दौऱ्याची सुरुवात होत आहे. त्याआधी संघाचा क्वारंटाईन पिरियड संपला असून सराव सत्रे सुरु झाली आहेत. तीन सामन्यांची वनडे मालिका झाल्यावर तीन सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे. या दोन मालिका झाल्यानंतर 17 डिसेंबरपासून चार सामन्यांची कसोटी मालिका होईल. भारताचा स्टार खेळाडू रोहित शर्मा याला दुखापतीमुळे वनडे आणि टी-20 मालिकेसाठी संघात स्थान दिले नाही. त्याच बरोबर ईशांत शर्मा देखील दुखापतीमुळे या मालिका खेळू शकणार नाही.

रोहित आणि ईशांत या दोघांचा कसोटी मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. हे दोन्ही खेळाडू सध्या बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फिट होण्यासाठी मेहनत घेत आहेत. अशातच भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रोहित आणि इशांत यांना लवकरात लवकर ऑस्ट्रेलियात पोहोचणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे.

एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री म्हणाले, एनसीएमध्ये रोहित शर्माच्या काही टेस्ट झाल्या आहेत. या टेस्टनंतर निश्‍चित होईल की त्याला किती मोठ्या विश्रांतीची गरज आहे. जर त्याला मोठी विश्रांती दिली तर अडचण होऊ शकते. कारण मग त्याला पुन्हा क्वारंटाइनमध्ये जावे लागले. त्यामुळे त्याच्या कसोटी खेळण्यात अडचणी येऊ शकतात. ऑस्टेलियातील नियमानुसार 14 दिवसांचा क्वारंटाइन आवश्‍यक आहे. दोन्ही संघातील पहिली कसोटी 17 डिसेंबर रोजी होणार आहे. तर 11 डिसेंबरपासून सराव सामने होणार आहेत. जर 10 डिसेंबरपर्यंत क्वारंटाइनमधून बाहेर यायचे असेल तर या दोघांना 26 नोव्हेंबरपर्यंत ऑस्ट्रेलियात यावे लागले.

आम्हाला हे पाहावे लागले की रोहितला किती मोठ्या विश्रांतीची गरज आहे. रोहित वनडे आणि टी-20 मालिका खेळणार नाही. रोहितला मोठी विश्रांतीची गरज असेल तर ते संघासाठी हिताचे नसेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.