सूर्यकुमार भारतीय संघात हवा होता

वेस्ट इंडीज क्रिकेटर ब्रायन लाराचे मत

मुंबई – वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारानेही सूर्यकुमारच्या पारड्यात आपलं मत टाकलं असून, सध्या ऑस्ट्रेलियामध्ये गेलेल्या भारतीय संघात सूर्यकुमारचा समावेश नसल्याबद्दल त्यानं नाराजी व्यक्त केली आहे. लाराच्या मते, इंडियन प्रिमियर लीगमध्ये यशस्वी मधल्या फळीचा फलंदाज म्हणून उत्तम कामगिरी केलेल्या सूर्यकुमारला ऑस्ट्रेलियामध्ये नेणे आवश्‍यक होते.

एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या संघात सलामीवीरांव्यतिरीक्त तिसऱ्या क्रमांकावर खेळणारा फलंदाजही तितकाच महत्वाचा असतो. संघातील सर्वात महत्वाचा खेळाडू ज्याच्यावर तुम्ही भरवसा ठेवू शकता अशा खेळाडूंना तिसऱ्या क्रमांकावर संधी दिली जाते. माझ्या दृष्टीकोनातून गेले काही हंगाम सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सकडून हे काम चोख बजावतो आहे. पण असं असूनही त्याला भारतीय संघात स्थान का मिळालं नाही, हेच कळत नाही.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी भारतीय संघाची निवड झाली आणि त्यात सूर्यकुमारचं नाव नव्हतं तेव्हा मीच निराश झालो होतो. तो चांगली फलंदाजी करत होता, धावाही काढत होता त्यामुळे त्याची संघात निवड होईल, असे मला वाटले होते. आयपीएलचं नाही तर स्थानिक क्रिकेटमध्येही त्याची कामगिरी चांगली होत आहे, याकडे लाराने लक्ष वेधलं आहे.

भारतीय संघात स्थान न मिळाल्यामुळे थोडीशी निराशा आल्याचं सूर्यकुमारने मान्य केलं आहे. आयपीएलदरम्यान विराट आणि आपल्यात घडलेला तो प्रकार क्षणिक असल्याचंही सूर्यकुमार म्हणाला. अनेक दिग्गज माजी खेळाडूंनी सूर्यकुमारला संयम ठेवण्याचा सल्ला दिला आहे. या सर्व प्रकरणानंतर पुढे जात राहणं भाग आहे. थांबण्यासाठी इथपर्यंत आलेलो नाही अशा आशयाचं एक सूचक ट्‌विट सूर्यकुमारने केलं आहे.

सूर्यकुमारने यंदाच्या आयपीएलमध्ये चार अर्धशतकांसह 480 धावा केल्या. त्याशिवाय सय्यद मुश्‍ताक अली आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतही गेल्या दोन हंगामांपासून तो सातत्याने दमदार कामगिरी करत आहे. त्यामुळे किमान ट्‌वेन्टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात आपली निवड होईल, अशी सूर्यकुमारला अपेक्षा होती. मात्र, संघात निवड नसली झाली, तरी रोहित शर्माने मला शांतपणे आणि धीराने खेळत राहण्याचा आणि सातत्यपूर्ण कामगिरी करण्याचा सल्ला दिला आहे.

ब्रायन लाराच्या या ताज्या वक्तव्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात सूर्यकुमार यादवला स्थान न मिळाल्यामुळे सोशल मीडियावर सुरु झालेला वाद अजुनही सुरुच असल्याचं दिसून येत आहे. भारताच्याही अनेक माजी खेळाडूंनी सूर्यकुमारला भारतीय संघात स्थान मिळायला हवं होतं असं मत व्यक्त केलं आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.