जामखेड – कर्जत जामखेड मतदार संघातून भाजपचे मंत्री राम शिंदे यांचा ४३ हजारांनी पराभव करून विजयी झालेले नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी कर्जत जामखेड तालुक्यात विजयी मिरवणूक काढून रात्री उशिरा पंढरपूर येथे जाऊन विठ्ठल रूक्मिणीचे सहकुटूंब दर्शन घेतले.
संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री राम शिंदे यांचा धक्कादायक परभाव झाला.शदर पवार यांचे नातु रोहित पवार यांनी तब्बल 1 लाख 35 हजार 824 मते घेऊन राम शिंदे यांचा 43 हजार 347 मतांनी धक्कादायक पराभव केला आहे. काल कर्जत येथे झालेल्या मतमोजणी झाल्यानंतर कर्जत-जामखेड राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. कर्जत शहरातून मिरवणूक काढली होती त्यानंतर रोहित पवार यांनी थेट चौंडी येथे जाऊन अहिल्यादेवींच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
नंतर रोहित पवार यांनी कुटुंबियांसोबत थेट पालकमंत्री राम शिंदे यांच्या चौंडी येथील निवासस्थानी भेट दिली. यावेळी पालकमंत्री राम शिंदे यांनी रोहित पवार यांचा फेटा बांधून सत्कार केला. तसंच, नव्या वाटचालीसाठी राम शिंदेच्या आईचे आशीर्वादही घेतले. यावेळी जामखेड तालुक्यातही विविध गावात रोहित पवार यांचे स्वागत करण्यात आले.
रोहित पवार हे आई सुनंदा, पत्नी कुंती यांच्यासोबत रात्री उशिरा पंढरपूरकडे रवाना झाले होते. तेथे गेल्यावर पवार यांनी विठ्ठल रूक्मिणीचे सहकुटूंब दर्शन घेतले.