दौंडच्या मतमोजणीत कार्यकर्त्यांनी अनुभवला थरार

निवडणूक अधिकारी जेवायला गेल्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची उत्सुकता ताणली

वरवंड – दौंड तालुक्‍यात मतमोजणीबाबत तालुक्‍यातील नागरिकांत मोठी उत्सुकता होती. पारंपरिक प्रतिस्पर्धी भाजपा उमेदवार राहुल कुल आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रमेश थोरात यांच्यात जोरदार लढत या निवडणुकीत पहायला मिळाली. भाजपाचे उमेदवार राहुल कुल हे विजयी झाल्याचे समजताच पाटस गावात भाजप आणि मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. पाटस गावातून जेसीबी यंत्राच्या साह्याने गुलालाची उधळण करण्यात आली.

दौंडमध्ये मतमोजणीला गुरूवारी (दि.24) सकाळी साडेआठ वाजताच सुरूवात झाली होती. पहिल्या फेरीत राहुल कुल यांनी अपेक्षेप्रमाणे 4650ची आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत कुल यांची मताची आघाडी एकुण 7852 मतांवर गेली. चौथ्या फेरीत ही आघाडी 8184 पर्यंत वाढली. पाचव्या फेरीत मात्र कुलांची आघाडी कमी होत 6343 एवढी आणि 20व्या फेरीपर्यत अवघी 525 मतांवर आली. कुलांची होणारी पिछेहाट पाहता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला होता, त्यातच निवडणूक निर्णयक अधिकाऱ्यांनी जेवणासाठी अर्धा तास विश्रांती घेतल्याने दोन्ही बाजुच्या कार्यकर्त्यानी आपले नेते विजयी झाल्याचे घोषीत करीत आनंदोस्तव साजरा केला. जेवणाची वेळ संपल्यानंतर अधिकाऱ्यांनी पोस्टल मते मोजणीस घेतली, त्यामध्ये देखील जास्त वेळ गेल्याने सर्वामध्ये संभ्रमाचे वातावरण होते.

अर्धा तासानंतर पोस्टल मोजणीत कुल यांना 73 मते जास्त मिळाल्याने कुलांना 598 मतांची आघाडी मिळाली. त्यानंतर झालेल्या 21व्या फेरीत कुल यांची 39 मतांनी पिछेहाट झाली. परंतु, अखेरच्या 22व्या फेरीत कुल यांना निर्णायक 4501 व रमेश थोरात यांना 4314 मते मिळाली. या चुरशीच्या लढतीत 746 मतांनी कुल विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद गायकवाड यांनी जाहीर केले.राहुल कुल विजयी झाल्याचे समजताच पाटस आणि पंचक्रोशीतील गावांत भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाके वाजवत गुलालाची उधळण करण्यात आली. कुल यांच्या विजयामुळे पाटस गावात दिवाळी अगोदरच दिवाळी झाली.

पाटस गावात भाजपा कार्यकर्त्यांनी जेसीबी यंत्राच्या साह्याने गुलालाची उधळण करीत पाटस येथील कारखाना चौकातून मिरवणूक काढली. ही मिरवणूक गावातून पुढे जात नागेश्‍वर मंदिरात नेण्यात आली आणि पाटस गावचे ग्रामदैवत श्री नागेश्‍वर महाराज यांचे मंदिरात नेण्यात आली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी दादासाहेब केसकर, साहेबराव वाबळे, अरुण भागवत, संभाजी देशमुख, डॉ .मधुकर आव्हाड, तानाजी केकान, गणेश मुरूमकर, राजेंद्र घाडगे, सतीश आव्हाड, हनुमंत भागवत, सचिन शितोळे, संदीप भागवत, संदीप वाबळे, सागर जाधव, विश्‍वास अवचट आदी भाजपा आणि मित्र पक्षाचे कार्यकर्त्यांसह मोठ्या नागरीक मोठ्या संख्येने
उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.