मृत्यूचंही राजकारण केलं जात असल्याचा एक नवीनच खेळ- रोहित पवार

वास्तविक आत्महत्या कोणाचीही असो ती व्हायलाच नको

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन क्षेत्रांतील अनेक जणांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये पडद्यावरचे कलाकार जसे आहेत तसेच पडद्यामागचे कलाकारही आहेत. सुशांत सिंह याने केलेल्या आत्महत्येनं तर संपूर्ण सिनेसृष्टी ढवळून निघाली. अभिनेत्री मयुरी देशमुख हिचा पती आशुतोष भाकरे यानेही काही दिवसांपूर्वी नांदेडमध्ये राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेला पंधरा दिवस लोटले असले तरी मयुरी देशमुख हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या पतीविषयी नुकत्याच व्यक्त केलेल्या भावना या हेलावून टाकणाऱ्या आहेत, अशा भावना आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केल्या.

रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टव्दारे आत्महत्या न करण्याचे आवाहन केले आहे. आज मृत्यूचंही राजकारण केलं जात असल्याचा एक नवीनच खेळ पहायला मिळतोय. मला वाटतं ही विकृती असून त्याला आपण थारा द्यायला नको, असे पवारांनी स्पष्ट केले.

रोहित पवार म्हणाले, वास्तविक आत्महत्या कोणाचीही असो ती व्हायलाच नको. मग त्यात शेतकरी असो, व्यावसायिक असो, गरीब असो, श्रीमंत असो किंवा सिनेसृष्टीतील कोणी असो. पण दुर्दैवाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक क्षेत्रांत नैराश्याचे काळे ढग जमा झालेत, त्यामुळं आत्महत्येच्या घटना वाढत आहेत आणि याचं लोण चित्रपट क्षेत्रापर्यंत येऊन थडकलंय. चित्रपट क्षेत्र हे आपल्याला पडद्यावर दिसणाऱ्या फक्त तारे-तारकांपुरतं मर्यादित निश्चितच नाही. यामागे खूप मोठी साखळी आहे.

सेट उभारणी करणारे, कॅमेरामन, सहकलाकार, स्पॉट बॉय, डिझायनर, मेकअप आर्टिस्ट, ड्राइव्हर, आचारी, व्हिडिओग्राफर, व्हिज्युअल आर्टिस्ट, सिनेमॅटोग्राफर, व्हिडिओ एडिटर, ग्राफिक्स डिझईनर, लाईट बॉय, पेंटर, हेअर ड्रेसर्स, कॉस्च्युम डिझाईनर, थिएटरमध्ये काम करणारे टेक्निकल व इतर कामगार असे अनेकजण यात आहेत आणि ही यादी आणखी खूप मोठी आहे. यापैकी सगळेच गर्भश्रीमंत आहेत असं नाही तर अनेकजण सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आहेत. अगदी ग्रामीण भागातून आलेल्यांचाही यात समावेश आहे. त्यामुळं या क्षेत्राकडं पाहण्याची आपली दृष्टीही बदलली पाहिजे आणि त्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नही केले पाहिजे. पण त्याऐवजी आज मृत्यूचंही राजकारण केलं जात असल्याचा एक नवीनच खेळ पहायला मिळतोय. मला वाटतं ही विकृती असून त्याला आपण थारा द्यायला नको, असे पवार म्हणाले.

रोहित पवार म्हणाले, गेल्या चार महिन्यांपासून कोरोना महामारीचा फटका इतर क्षेत्राप्रमाणे या सिनेसृष्टीलाही बसला आहे. वास्तविक करमणूक हे पैसा मिळवून देणारं क्षेत्र आहे, पण कोरोनामुळं इथं होणाऱ्या आत्महत्या हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे. म्हणून या लोकांची अडचण समजून घेऊन त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी आपण सर्वांनीच लक्ष केंद्रित करायला पाहिजे, पण इथं उलट दिसतंय. अनेकजण राजकारण करण्यातच आपली ताकद खर्च करतायेत, हे योग्य नाही. शेवटी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सर्वांना सन्मान करावाच लागेल, पण एखाद्याच्या मृत्यूवर राजकारण करणं हा अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे.

म्हणून ‘आपल्या प्रियजनांसाठी अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवून तू गेलास’ असं मयुरी देशमुख हिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं असलं तरी असं म्हणण्याची वेळ यापुढं कुणावरच येऊ नये, याची काळजी माझ्यासह समाज म्हणून आपण सर्वांनी आणि केंद्र व राज्य सरकार यांनी घ्यायला हवी आणि त्यासाठी प्रयत्न करायला हवेत असं वाटतं.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.