पुणे – शहरातील एका रिक्षा चालकाने प्रवाशाचे रिक्षात विसरलेले 80 हजार रुपये प्रामाणिकपणे परत केले. रिक्षा चालकाने स्वत: पोलिस ठाण्यात येऊन ही माहिती दिली. दरम्यान प्रवाशाने ऑन लाईन पध्दतीने यासंदर्भात तक्रार दाखल केली होती.
तुळशीराम गणपत परेदशी (52,रा.भवानी पेठ) असे रिक्षा चालकाचे नाव आहे. त्याने भावानी पेठ पोलिस चौकीत येऊन सांगितले की, 13 ऑगस्ट रोजी तो लष्कर परिसरातून एका अपंग व्यक्ती व बुरखा घातलेल्या महिलेस बिबवेवाडी येथे सोडून आला होता. तेव्हा त्यांची बॅग रिक्षामध्ये राहिली होती. त्यामध्ये कागदपत्रे आणि 80 हजार रोख रुपये आहेत.
पोलिसांनी तातडीने बॅगेतील कागदपत्रांवरुन महिलेस बोलावून घेतले. तीच्याकडून बॅगेची खात्री झाल्यावर ती तीला सुपूर्त करण्यात आली. रोख रक्कम व कागदपत्रे मिळाल्याने महिलेने रिक्षा चालकाचे आभार मानले. पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, सचिन खेतमाळस, सहायक पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय खुटवळ, पोलिस कर्मचारी अलाटे, शितोळे, लोखंडे यांनी सहकार्य केले.