विक्रमापासून रोहित वंचित

नागपूर: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या तीनही प्रकारात मिळून सर्वाधिक षटकार फटकावणारा पहिला भारतीय फलंदाज बनण्यात आज भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा अपयशी ठरला. 400 षटकार पूर्ण करण्यासाठी त्याला केवळ 2 षटकार गरजेचे होते, ते आज पूर्ण होतील अशी अपेक्षा होती. मात्र, तो शफीउलच्या गोलंदाजीवर केवळ 2 धावा काढून बाद झाला. आता पुढील महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध होत असलेल्या मालिकेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

                                                                 पंत पुन्हा अपयशी…                                                                                  फलंदाज आणि यष्टिरक्षक रिषभ पंतला रोहित तसेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी पाठिंबा दिला असला तरी त्याच्या मागचे शुक्‍लकाष्ट काही संपताना दिसत नाही. पहिल्या दोन सामन्यांमध्ये अपयश आलेल्या पंतला निर्णायक सामन्यातही धावा करता आल्या नाहीत.

षटकार फटकावण्यासाठी मसलपॉवर नव्हे तर अचूक टायमिंग पाहिजे असे रोहितच म्हणाला होतचा. मात्र, आज त्याचेच टायमिंग चुकले. आतापर्यंत ही कामगिरी वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल आणि पाकिस्तानचा शाहीद आफ्रिदी यांनीच केली आहे. बांगलादेशविरुद्धच्या या मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाल्याने आजच्या सामन्याला निर्णायक महत्त्व आले. रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (कसोटी, एकदिवसीय आणि टी-20) 398 षटकार फटकावले आहेत. ख्रिस गेलचे 534 षटकार आहेत तर, शाहीद आफ्रिदी 476 षटकारांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

रोहित शर्मानं आज दोन षटकार लगावून 400 चा आकडा गाठला असता तर तो या यादीत तिसऱ्या स्थानावर आला असता तसेच हे दोन्ही फलंदाज आता संघातून बाहेर असल्याने त्यांना मागे टाकून रोहितला नंबर वनवर देखील विराजमान होता आले असते. आता त्यासाठी त्याला बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे.

रोहितने एकदिवसीय सामन्यांमध्ये 232, कसोटीमध्ये 51 आणि टी-20 मध्ये 115 षटकार लगावले आहेत. राजकोटमधील दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने बांगलादेशवर 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला होता. रोहितच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर भारताने हा सामना जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली होती. त्या सामन्यात रोहितने केवळ 43 चेंडूत 85 धावांची धडाकेबाज खेळी केली होती. त्यात 6 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता.

Leave A Reply

Your email address will not be published.