नवी दिल्ली- स्वित्झर्लंडमधील दावोस येथे पुढील वर्षी जानेवारीमध्ये होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेच्या 50 व्या वार्षिक शिखर बैठकीला देशातील 100 मुख्य कार्यकारी अधिकारी, काही राजकीय नेते आणि निवडक बॉलिवूड कलाकारांबरोबर अभिनेत्री दीपिका पदुकोणही उपस्थित राहणार आहे. ‘सुसंगत आणि शाश्वत जग’ बनवण्यासाठी कशाची आवश्यकता आहे यावर चर्चा करणे, हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे.
या जागतिक आर्थिक व्यासपिठाचा 50 वा वर्धापन दिन असल्यामुळे यावेळी अनेक जागतिक नेतेही उपस्थित राहणे अपेक्षित आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तसेच रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे दोघेही गेल्या वर्षीच्या दावोसला गेले नव्हते. ते यावेळी तेथे येऊ शकतात असा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे जगभरातील श्रीमंत आणि सामर्थ्यवान देशांची वार्षिक परिषद या वेळेस आणखी एक मोठ्या प्रमाणावर होणार आहे.
भागीदार भांडवलशाही, पॅरिस कराराच्या प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी सरकारांना आणि आंतरराष्ट्रीय संस्थांना मदत करणे, शाश्वत विकासाची लक्ष्ये, तंत्रज्ञान आणि व्यापार कारभारावर चर्चा सुलभ करणे ही या वेळच्या परिषदेची प्रमुख उद्दिष्टे असतील.
भारताकडून उद्योगपती गौतम अदाणी, मुकेश अंबानी, राहुल आणि संजीव बजाज, कुमार मंगलम बिर्ला, टाटा समुहाचे एन. चंद्रशेखरन, सज्जन जिंदाल, उदय कोटक, एसबीआयचे रजनीश कुमार, आनंद महिंद्रा, सुनिल मित्तल यांच्यासह अभिनेता शाहरुख खान, करण जोहर आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणची उपस्थिती निश्चित झालेली आहे.