पाचगणी – जावळी तालुक्यात गौण खनिजांचे अतिरिक्त उत्खनन केल्याप्रकरणी रोड वे सोल्युशन इंडिया कंपनीच्या क्रशरला तीन कोटी 47 लाख रुपयांचा दंड जावळीचे तहसीलदार राजेद्र पोळ यांनी केला आहे. केंजळ येथील रोड वे सोल्युशन इंडिया इन्फ्र लिमिटेड (पुणे) कंपनीचे महाबळेश्वर ते धामणेर या हमरस्त्याच्या बांधकामाकरीता गौण खनिज उत्खननाचा परवाना देण्यात आला होता.
या गौण खनिज उत्खननाच्या दिलेल्या परवान्यापेक्षा 374 ब्रास जादा उत्खनन कंपनीने केल्याचा अहवाल जावळीच्या तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला होता. तहसीलदारांनी रोड वे सोल्यूशन इंडिया कंपनीवर केलेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. कंपनीने केंजळ येथील गट नंबर 62/1 मधील 2.11 हेक्टर आरमध्ये तात्पुरता परवाना घेऊन क्रशर उभारणी केली आहे.
या क्रेशरच्या माध्यमातून दिलेल्या परवानगीपेक्षा 374 ब्रास अतिरिक्त गौण खनिजाचे उत्खनन केले असल्याचा अहवाल जिल्हाअधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे. कंपनीच्या अनधिकृत वाहतूक केलेल्या वाहनांचा ताबा अद्याप घेण्यात आला नाही. तसेच कंपनीने अद्याप दंडाचा आदेश होऊनही कोणतीही रक्कम शासकीस खजिन्यात जमा न केलेली नाही. त्यामुळे तहसीलदार कंपनीविरोधात काय कारवाई करणार याबाबत उत्सुकता आहे.