अस्ताव्यस्त पार्किंगमुळे अपघाताची शक्यता ः वाहनचालकांवर कारवाईची मागणी
कुरकुंभ – कुरकुंभ (ता. दौंड) येथील औद्योगिक वसाहतीमधील अंतर्गत रस्त्यांवर काही कंपन्यांसमोर मोठ्या प्रमाणावर अवजड वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे या अंतर्गत रस्त्यांच वाहनतळ बनत चाललं आहे. या ठिकाणी लावलेल्या अस्ताव्यस्त वाहनांमुळे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
येथील औद्योगिक वसाहतीत बहुतांश केमिकल कंपन्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे केमिकल, पावडर, औषधे, कच्चा माल तसेच काही अवजड वस्तु यांची आवक जावक होत असते. बाहेरील ठिकाणांहून अवजड माल घेऊन आलेली अवजड वाहने बऱ्याच वेळ औद्यगिक वसाहतीतील काही कंपन्यांच्या बाहेर रस्त्यावरच उभी असतात. ही वाहने येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूला सर्रास उभी केली जातात.
रात्रीच्या वेळी या गाड्यांचा अंदाज न आल्याने अनेक कामगारांचे या रस्त्यावर छोटे मोठे अपघात झाले आहेत. येथे कामगारांची संख्या जास्त असून दुचाकी गाड्याही कंपनीच्या बाहेर अस्ताव्यस्त उभ्या केलेल्या असतात. त्यामुळे अशा रस्त्याच्या कडेला धोकादायकपणे उभ्या असलेल्या वाहनांवर, कारवाई करण्याची मागणी येथील वाहनचालक तसेच कामगार वर्गातून केली जात आहे.
कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील विविध कंपन्यामध्ये येणारी वाहने वेड्या वाकड्या पद्धतीने उभी करण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. याबाबत मागील काही महिन्यांपूर्वी अशा चालकांविरोधात कारवाई करण्यासाठी कुरकुंभ पोलीस स्टेशनला याबाबत लेखी पत्र दिले होते, मात्र हा प्रकार कमी होत नसल्याने संबंधित कंपन्या व पोलीस स्टेशन यांना याबाबत आणखी एकदा पत्रव्यवहार करण्यात येणार आहोत.
– मिलिंद पाटील, उपअभियंता कुरकुंभ औद्योगिक वसाहत.