महाविद्यालये सुरू होताच रोडरोमिओ सक्रिय

पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज; पालकवर्गांत चिंता

जामखेड – नुकताच 2018-19 शैक्षणिक वर्षातील दहावी, बारावी परिक्षार्थींचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील वर्गाचे शिक्षणाकरिता प्रवेश घेणे, इतत्र उच्च शिक्षणाकरिता प्रवेश दाखला काढून घेणे आदी प्रकियेसाठी लगबग शाळा, महाविद्यालयांवर विद्यार्थी – विद्यार्थिनींची गर्दी होऊ लागल्याने, टवाळखोर रोडरोमियोंनींही पुन्हा आपले डोके वर काढायला सुरुवात केली आहे.

शाळा महाविद्यालयांच्या परिसरात, रस्त्यांवर, बस स्थानक आदी ठिकाणी उनाड मुलांचे टोळके उभे रहायला सुरुवात होऊ लागली. शाळा, कॉलेजची वेळ हेरुन मुलींना बघून मोठ्याने हॉर्न वाजविणे, अश्‍लिल गाणे म्हणणे, टोमणे देण्याचा त्यांनी उद्योग सुरू केल्याने आम्ही आमच्या मुलींना शिकवावं, की घरीच बसवावं असा प्रश्न आता पालकांमधून ऐकावयास मिळू लागला आहे. जून महिन्यात जवळपास सर्वच शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत.

उनाड मुलांचे टोळके परिसरात उभे रहायला सुरुवात झाली आहे. एस.टी. किंवा खासगी वाहनांतून प्रवास करतांना छेडछाडीच्या अनेक समस्यांचाही मुलींना सामना करावा लागतो. घर सोडल्यापासून तर शाळा, महाविद्यालयापर्यंत ते परत घरी येईपर्यंत विद्यार्थिनींना त्रास सहन करून आपली शिक्षणफेरी करावी लागते. शहरात खासगी शिकवणी चालकांनी सकाळी पाचपासून शिकवण्यांचे वर्ग सुरू केले आहेत.

त्यामुळे मुलींना घरातून सकाळी सहा ते साडेसहा वाजता बाहेर पडावे लागत आहे. रस्त्यावर अंधार असतो. अशा परिस्थितीमुळे एकट्या- दुकट्या मुलींची पाठलाग करून छेड काढली जाते. रोडरोमिओंचा अधिक प्रमाणावर उच्छाद वाढला असून, विना नंबरची मोटरसायकल पळविणे, मुलींच्या जवळ जाऊन ब्रेक मारणे, मोठ मोठ्याने हॉर्न, शिट्या वाजविणे असे प्रकार आता नित्याचेच झाले आहेत. मुलींना याचा त्रास होत आहे.

लोकलाजेस्तव मुली त्रास सहन करून, गप्प राहत आहेत. याचा गैरफायदाही टोळी घेत आहे. शाळांच्या रस्त्यावरील पानटपऱ्या व कोपरे या टोळक्‍यांचे अभयस्थान झाले आहे. शहरात दोन उच्च माध्यमिक शाळा, एक महाविद्यालय आहे. त्यामुळे बाहेर गावावरून उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या मुलींची संख्या अधिक आहे. शहरातील नवीन तहसील कार्यालयाजवळ बीड कॉर्नर, खर्डा चौक, तहसील कार्यालय, नगर रोड, एमएसईबी कॉर्नर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रमाणावर रोडरोमिओंची गर्दी असते.

आजवर पोलीस पथकाने कारवाई केल्याचे ऐकीवात नाही? कोणाची भीतीच राहिली नसल्याने मुलींच्या छेडछाडीचे प्रकार वाढले. ग्रामीण मुलींना बसस्टॅन्डवरच गाठून हे टोळके त्रास देत असते. धक्‍का मारणे, असे गंभीर प्रकारही घडत आहेत. मात्र अद्याप याकडे कुणीही लक्ष दिले नाही. पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन विशेष पथकाव्दारे रोडरोमिओंवर कडक कारवाई करावी अशी मागणी पालकांमधून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.