शेवगाव -करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विविध सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना नियुक्तीच्या ठिकाणी राहणे बंधनकारक केले आहे. मात्र, शेवगाव पंचायत समिती, नगरपरिषद तसेच काही बॅंका व सरकारी कार्यालये याला अपवाद आहेत की काय, अशी शंका येते. येथील पंचायत समितीमध्ये तर रेड झोन असलेल्या औरंगाबाद जिल्हयातून येणारे एक अधिकारी आहेत.
तर नगरपरिषदेत केडरचे सहा अधिकारीही जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून ये जा करत आहेत. करोनाच्या या संभाव्य वाहकांना रोखायला हवे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
शेवगाव तालुक्यात करोनाचा शिरकाव तसा उशिरा झाला. मात्र शिरकाव झाल्यावर पंधरवाडयाच्या आतच बाधितांची संख्या नऊवर पोचली.
या काळात प्रशासन, आरोग्य विभाग, स्वच्छता कर्मचारी आदी करोना योद्ध्यांनी प्रयत्नाची शिकस्त करून तालुका करोनामुक्त केला. हे निश्चित प्रशंसनीय असून प्रशासनाने अद्यापही काही बाबी सतर्कतेने घ्यायला हव्यात. अन्यथा करोनाचा फेरा पुन्हा येऊ शकतो, अशी स्थिती आहे.
गेल्या आठवड्यात पंचायत समितीमधील शाखा अभियंता करोनाबाधित आढळल्यानंतर त्यांच्या संपर्कातील दहा जणांना तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. यावेळी गटविकास अधिकारी व सहाय्यक गटविकास अधिकारी यांनी स्वतःहून होऊन तपासणी करून घेतली होती. त्यातूनही काही तपासणीविना राहिले असल्याची व याच विभागातील एक आधिकारी तर रेड झोन असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातून सध्या ये-जा करत असल्याची गंभीर तक्रार आहे. या बाहेरून ये-जा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने कारवाई न केल्यास पुन्हा मोठ्या उद्रेकाला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पंचायत समितीमधील कार्यालयात तालुक्यातील गावोगावच्या सरपंचांना पदाधिकाऱ्यांना व जनतेला कामानिमित्त वारंवार यावे लागते. त्यामुळे या ये-जा करणाऱ्या अधिकाऱ्याकडून संसर्ग झाला तर तिचा फैलाव मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने याबाबत तातडीने लक्ष घालणे आवश्यक आहे. तसेच लॉकडाऊन उठवले असले तरी किमान जिल्हा नाकेबंदी तरी कडक व्हायला हवी, अशी नागरिकांची मागणी आहे.
नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करून सतर्क राहावे. तालुक्याला करोनापासून दूर ठेवण्यास प्रशासनाला सहकार्य करावे. मुख्यालयी न राहता रेड झोनसारख्या भागातून ये जा करणाऱ्या या सुशिक्षितांनी आपण होऊन हा धोका टाळावा. अन्यथा त्याविरूध्द प्रशासनाकडे तक्रार करावी लागेल.
शफिक सय्यद, सरपंच, कऱ्हेटाकळी