पुणे – करोना संसर्गाला अटकाव घालण्यासाठी प्रशासनाने निश्चित केलेल्या प्रतिबंधित क्षेत्रात पोलिसांना धक्काबुक्कीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पर्वती दर्शन भागात पोलीस शिपायाला धक्काबुक्की केल्याप्रकरणी तिघांना अटक केली.
किरण संजय गिरीगोसावी (21), अमित दगडू निवंगुणे (27), रवीराज संजय गिरीगोसावी (तिघे रा. पर्वती दर्शन) यांना अटक केली. पोलीस शिपाई राहुल आवारी यांनी यासंदर्भात दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्वती दर्शन भागातील भामरे चौकात मध्यरात्री आरोपी गिरीगोसावी, निवंगुणे थांबले होते. शहरात दररोज रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदीचे आदेश लागू आहेत. गस्त घालणारे पोलीस शिपाई राहुल आवारी यांनी तिघांना हटकले आणि घरी जाण्यास सांगितले. या कारणावरून तिघा आरोपींनी आवारी यांच्याबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली. तिघांनी आवारी यांना धक्काबुक्की केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक शंकर सलगर तपास करत आहेत.