चिंबळी -माजगाव (ता. खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची पाठ्यपुस्तके सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत पालकांना वाटप करण्यात आले, अशी माहिती माजी उपसरपंच पवन पाटारे यांनी दिली.
यंदाच्या शैक्षणिक वर्ष सोमवार (दि. 15) पासून सुरु झाले आहे; परंतु करोनाच्या वाढत्या प्रसारामुळे सर्व शाळा बंदच आहेत. त्यामुळे या साथीच्या काळात शक्य होईल तेवढे ऑनलाइन शिक्षण देण्याचा प्रयत्न आहे.
पालकांच्या मदतीने विद्यार्थांना घरीच शिक्षण मिळावे या हेतूने सर्व विद्यार्थांच्या पालकांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले, असे पाटारे यांनी नमूद केले.
याप्रसंगी शाळा समितीचे तथा ग्रामपंचायतीचे सदस्य गणेश जाधव, माजी अध्यक्ष खंडू पाटारे, शाळा समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक, पालक, शिक्षक उपस्थित होते.