प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 26 -महापालिका क्षेत्रातील पाषाण तलाव परिसरात पक्षी निरीक्षणात अडथळा येत असल्याचे कारण देत अविवाहित जोडप्यांना परिसरात येण्यास बंदी घालण्याचा आदेश तत्काळ रद्द करण्याची मागणी “राईट टू लव्ह’ संघटनेने केली आहे.
ऍड. विकास शिंदे, के अभिजित, सुशांत आशा, मयुरी सुषमा, ऍड. बुद्धाप्पा जाधव, ऍड. गणेश माने, ऍड. प्रतीक जगताप, धनंजय गलांडे यांनी ही निवेदनाद्वारे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे ही मागणी केली आहे. हा आदेश पूर्णपणे बेकायदा असून, संविधानातील मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारा असल्याचेही म्हटले आहे.
शहरामध्ये महाविद्यालयांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हटले जाते. देशभरातून मुलं-मुली शिक्षण, नोकरी, व्यवसायासाठी पुण्यात येत येतात. जोडप्यांना योग्य व सुरक्षित जागा नसल्यामुळे नदीलगतचे रस्ते, झेड ब्रीज, विविध पुलांचे कठडे, टेकड्यांवर भेटावे लागते. तेथेही संस्कृती रक्षणाच्या नावावर मारहाण, शिवीगाळीच्या घटना घडल्याची उदाहरणे आहेत.
या परिस्थितीत मनपा क्षेत्रातील गार्डन्स “कपल गार्डन्स’ म्हणून घोषित करावीत, उद्यान विभागाचा पाषाण तलाव परिसरात अविवाहित जोडप्यांना प्रवेश बंदीचा आदेश रद्द करावा, अन्यथा महापालिकेविरोधात आंदोलन करण्यात येईल. तसेच याबाबत न्यायालयात दाद मागण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे.
प्रेमी जोडप्यांचा सन्मान करा
“प्रेम करणे’ हा प्रत्येक व्यक्तीचा मुलभूत अधिकार आहे. आजच्या बदलत्या आधुनिक युगात तरुण-तरुणी बिनधास्तपणे प्रेम करताना दिसतात. प्रेमाला विरोध करणाऱ्या संस्कृतीरक्षकांचा विरोध कमी होत चालला आहे. प्रेम होणे, ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे प्रेम करणाऱ्यांचा सन्मान झालाच पाहिजे, असेही आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.