* ग्रामदैवतास धनादेश अर्पण
* व्यापाऱ्यांकडून थोडी उतराई
मांडवगण फराटा – येथील शेतकरी किसन बाबुराव फराटे यांच्या फ्लॉवरच्या 17 पिशव्यांना किलोला अवघा साडेतीन रुपये दर मिळाला होता. साडेनऊ रुपये पट्टी त्यांच्या हाती आली होती. ही रक्कम व्यापाऱ्याला परत केली होती. यानंतर मुंबई येथील बाजार समितीचे व्यापारी सूर्यकांत शेवाळे यांनी भरपाई म्हणून अकरा हजार रुपयांचा धनादेश फराटे यांना दिला होता. त्यानंतर हा धनादेश ग्रामदैवत वाघेश्वर मंदिराला अर्पण केला आहे.
शेतकरी फराटे यांच्या फ्लॉवरच्या 17 पिशव्यांना किलोला साडेतीन रुपये दर मिळाला. एकूण साडेनऊ रुपये पट्टी आली होती. ही पट्टी त्यांनी धनादेशाद्वारे पुन्हा व्यापाऱ्याला पाठविली होती. हा धनादेश पाठविण्यासाठी फराटे यांना वीस रुपये खर्च आला होता. हा धनादेश व त्यांच्या मालाची पट्टी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. यावर सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या. दैनिक प्रभातने फराटे यांची व्यथा सडेतोड मांडली होती. याची दखल घेऊन मुंबई येथील बाजार समितीचे व्यापारी सूर्यकांत शेवाळे यांनी फराटे यांची भेट घेऊन त्यांना अकरा हजारांचा धनादेश नुकसान भरपाई म्हणून दिला आहे.
या मदतीमुळे शेतकऱ्याला थोडा दिलासा मिळाला. तरीही राज्य शासनाने शेतकऱ्याच्या शेतमालाला आधारभूत किंमत दिली तर शेतकऱ्यापुढे असे आर्थिक संकट उभे राहणार नाही, असे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. नुकतेच व्यापारी रघुनाथ शेवाळे यांनी मांडवगण फराटा येथे किसन फराटे यांची भेट घेत ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्यांच्याकडे अकरा हजारांचा धनादेश सुपूर्त केला.
यावेळी सरपंच शिवाजी कदम, उपसरपंच बाळासाहेब फराटे, तंटामुक्तीचे अध्यक्ष हनु आण्णा फराटे, अमोल जगताप, सागर फराटे, अभिजित जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे किसन फराटे यांनी त्यांना मिळालेला अकरा हजारांचा धनादेश त्वरित ग्रामदैवत वाघेश्वर मंदिराला अर्पण केला आहे. कमी बाजारभाव मिळाल्याबद्दल विषय लावून धरल्याने शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असून फराटे व ग्रामस्थांनी दैनिक प्रभातचे आभार मानले आहेत.
हे सर्व मी पैशासाठी केले नसून शेतकरी राजाला न्याय मिळवून देण्यासाठी हे पाऊल उचलले होते. शेतकरी त्याला मिळत असलेल्या कमी बाजारभावाबाबत कधीही आवाज उठवत नाही. माझ्या या कृत्याने शेतकऱ्यांत जनजागृती होणार असून पुढील काळात बाजारभावाबाबत शेतकऱ्यांची मोठी चळवळ उभी राहण्याची गरज आहे.
– किसन फराटे, फ्लॉवर उत्पादक शेतकरी, मांडवगण फराटा