प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 26 -मेट्रोचा शिवाजीनगर स्थानक ते स्वारगेट हा सहा किलोमीटरचा भूमिगत मार्ग आहे. जमिनीखाली तब्बल 100 फूट खोल असलेल्या या मार्गातही प्रवाशांना मोबाइल फोन वापरता येणार आहे. त्यासाठी महामेट्रोकडून इन बिल्ड सोल्यूशन सिस्टीम (आयबीएस) ही यंत्रणा वापरण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना प्रवासतही अखंड मोबाइल सेवा मिळणार आहे. त्यासाठीचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महामेट्रोकडून देण्यात आली. देशात अनेक भुयारी मेट्रोमध्ये ही यंत्रणा वापरण्यात आलेली आहे.
मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या 16 किलोमीटरच्या मार्गातील सुमारे 6 किलोमीटरचे अंतर हे भूमिगत असणार आहे. त्यासाठी मेट्रोकडून जमिनीखाली जवळपास 100 फूट बोगदा खोदण्यात आला आहे. या खोदाईचे काम 4 जून रोजी पूर्ण झाल्यानंतर आतमधील इतर सर्व बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यानंतर आता महामेट्रोकडून बोगद्यात मेट्रोचे रूळ (ट्रॅक), विद्युत तारा बसविणे तसेच सिग्नल यंत्रणा बसविण्याच्या कामाला नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे शहरात अनेक ठिकाणी उंच इमारतींच्या तळमजल्याच्या पार्किंगमध्ये मोबाइलची रेंज येत नाही. मात्र, मेट्रोकडून जमिनीखाली असलेल्या प्रवासातही नागरिकांना मोबाइल सुविधा असणार आहे.
रूळ टाकण्याचे काम सुरू
महामेट्रोकडून या 6 किलोमीटरच्या बोगद्याचे खोदाईचे काम पूर्ण केल्यानंतर आता बोगद्यामध्ये मेट्रोचे रूळ (ट्रॅक) टाकण्यासह, विद्युत तारा व सिग्नल यंत्रणेसाठी ओएफसी केबल टाकण्यात येत असून, त्यासाठी बोगद्यात कोणत्याही प्रकारची तोडफोड अथवा इतर प्रकारची खोदाई करावी लागत नाही. या कामात ट्रॅकचे प्रत्येकी 57 मीटर लांबीचे तुकडे बोगद्यात पोहचविण्यात आले असून, त्यांची जोडणी सुरू आहे. हे काम शिवाजीनगर आणि स्वारगेट या दोन्ही बाजूंकडून सुरू करण्यात आले आहेत. गणेशोत्सव कार्यकर्ते ठरतायेत जनतेचा आधार ः खासदार बापट