रश्मी रॉकेट या सिनेमाचे शुटिंग करत असलेल्या तापसी पन्नूला बुधवारी हेल्मेट न घालता बाईक चालवल्याबद्दल वाहतुक विभागाने दंड ठोठावला आहे. या सिनेमातल्या एका सीनमध्ये तापसीला बाइक चालवायची होती. हा सीनचा फोटो तापसीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि याच सीनसाठी आपल्याला दंडही झाला असल्याचे तिने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहीले आहे.
या फोटोमध्ये तापसी मोटरसायकलवर बसलेली पाठमोरी दिसते आहे. तिच्या या पोस्टवर बऱ्याच सेलिब्रिटी आणि कलाकारांनी कॉमेंटही केल्या आहेत. तर काही जणांनी चक्क स्मायली पोस्ट करून तिला झालेल्या दंडाची चेष्टाही केली आहे. पाठमोरी दिसत असल्यामुळे वाहतुक पोलिसांनी खरे तर तापसीला शोधून काढायला नको होते, असे अनुभव सिन्हाने म्हटले आहे. “रश्मी रॉकेट’ या सिनेमात तापसी गावातल्या एका युवा खेळाडूचा रोल करते आहे.
स्पर्धेच्यावेळीच झालेल्या दुखापतींवर ती कशी मात करते, अशी या सिनेमाची कथा आहे. आकर्ष खुरानाने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे, तर रॉनी स्क्रूवाला हा या सिनेमाचा निर्माता असणार आहे. “रश्मी रॉकेट’ पुढील वर्षी रिलीज होणार आहे.