पिंपरी – वाकड-हिंजवडी रोडवरील एका स्पा सेंटरवर पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने छापा टाकला. यामध्ये पोलिसांनी 32 हजार 535 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत वेश्या व्यवसाय करणाऱ्या पाच महिलांची सुटका केली.
वाकड-हिंजवडी रोडलगत लॉंज कॅफे हब रुफ टॉप या मॉलमधील पहिल्या मजल्यावर अव्हिरा थाइ स्पा या मसाज सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी बनावट गिऱ्हाईक पाठवून वेश्या व्यवसायाची खात्री करून केली. त्यानंतर सामाजिक सुरक्षा पथकाने या स्पा सेंटरवर छापा टाकला. त्यात पोलिसांनी अवैधरित्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या पाच महिलांची सुटका केली.
स्पा सेंटरची 31 वर्षीय महिला व्यवस्थापक आणि स्पा सेंटरचा मालक राहुल चव्हाण (वय 40) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींकडून 24 हजार 500 रुपयांची रोख रक्कम, 8 हजारांचा मोबाईल, 35 रुपयांचे इतर साहित्य असा एकूण 32 हजार 535 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.