तमिळ सुपरस्टार आणि रजनीकांत यांचा जावई धनुष याच्या एका गाण्याने युट्युबवर विक्रम नोंदवला आहे. त्याच्या “मारी 2′ सिनेमातील “राउडी बेबी’ या गाण्याला युट्युबवर प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. या गाण्याला आतापर्यंत तब्बल 1 अब्ज व्ह्यूज मिळाले आहेत. ही संख्या अजूनही वाढते आहे. आश्चर्याची आणि गमतीची गोष्ट म्हणजे धनुषचे “कोलावरी डी’ हे गाणे देखील असेच गाजले होते.
या गाण्यानेही प्रेक्षकांना वेड लावले होते. “कोलावरी डी’ हे गाणे रिलीज झाल्याला 9 वर्षे पूर्ण झाल्याच्याच दिवशी “राउडी बेबी’ हे गाणे देखील युट्युबवर रिलीज झाले आहे. स्वतः धनुषने ही आनंदाची गोष्ट आपल्या फॅन्सबरोबर शेअर केली आहे. “तब्बल 1 अब्ज व्ह्यूज मिळालेले हे दक्षिणेतील पहिले फिल्म सॉंग आहे. ही गोष्ट सांगण्यास मला खूप अभिमान वाटतो आहे.’
असे धनुषने म्हटले आहे. बालाजी मोहन द्वारा दिग्दर्शित “मारी 2′ हा सिनेमा 2018 मध्ये रिलीज झाला होता. त्यामध्ये धनुष आणि साई पल्लवी यांच्या मुख्य भूमिका होत्या. “राउडी बेबी’ हे गाणे स्वतः धनुष आणि थी यांनी मिळून गायले होते. या गीताचे लेखनही धनुषनेच केले होते. हे गाणे युट्युबवर 28 ऑक्टोबर 2018 रोजी रिलीज झाले होते.