मावळातील 1319 शेतकऱ्यांना परतीचा तडाखा

आंदर, नाणे, पवनमावळातील 511 हेक्‍टर क्षेत्राला फटका


149 गावे बाधित; आंदर मावळात सर्वाधिक पावसाची नोंद

पिंपरी -गेली चार दिवसांत कोसळणाऱ्या पावसाने मावळ तालुक्‍यातील भातपिकाला चांगलाच फटका बसला. काढणीयोग्य पिकाला या वादळी पावसाने आडवे करीत शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पीक हिरावून घेतले. पवनमावळ, आंदर मावळ आणि नाणे मावळ अशा तीन वेगवेगळ्या भागात परतीच्या पावसाने भाताला झोडपून काढले.

संपूर्ण मावळातील अंदाजे 511 हेक्‍टर क्षेत्राला पावसाचा तडाखा बसला असून, सुमारे एक हजार 319 शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसला. मागील दोन दिवसात आंदर मावळात सर्वाधिक म्हणजे 86 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तालुक्‍यातील अंदाजे 149 गावांना “परती’चा फटका सहन करावा लागल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

मावळ तालुक्‍यात यावर्षी 15 हजार 500 हेक्‍टर हे खरीप क्षेत्र आहे. त्यापैकी भात पिकासाठी 12 हजार 105 हेक्‍टर क्षेत्रावर उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. त्यापैकी 12 हजार 672 हेक्‍टरवर लागवड पूर्ण झाली. म्हणजेच 104.7 टक्‍के उद्दिष्ट गाठले आहे. त्यामध्ये पारंपारिक भात लागवड (11 हजार 261), चारसूत्री (1 हजार 205), सगुणा राईस तंत्र (एसआरटी 169), यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड (37) अशा पद्धतीने लोणावळा, कुसगाव बुद्रुक, कार्ला, टाकवे खुर्द, खडकाळा, टाकवे बुद्रुक, वडेश्‍वर, वडगाव, तळेगाव दाभाडे, परंदवडी, काळे कॉलनी, शिवणे महसुली क्षेत्रात लागवड केली आहे.

भात पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या मावळात इंद्रायणी आणि फुले समृद्धी हे वाण प्रामुख्याने घेतले जाते. तसेच कोळंब, आंबेमोहर आणि स्थानिक वाणही घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. पिकाचे चांगले उत्पादन व्हावे, याकरिता शेतकरी कृषी विभागाच्या मदतीने भात लागवडीकरिता चारसूत्री तंत्रज्ञान वापरावर प्राधान्य दिले. यावर्षी चारसूत्री, एसआरटी आणि यांत्रिकीकरण याद्वारे लागवडी केल्या आहेत. तरीही चारसूत्री शेती तंत्रज्ञान सोपे, शास्त्रीयदृष्ट्‌या कार्यक्षम आणि एकूण लागवडीचा म्हणजे बी, मजूर व खत यांचा खर्च कमी करणारे, वातावरणाचे प्रदूषण टाळणारे व भातशेती निश्‍चितपणे फायदेशीर ठरत असल्याने शेतकरी चारसूत्री लागवडीला प्राधान्य दिले, त्यादृष्टीने शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा असतानाच अवकाळी पावसामुळे सर्वात आधी लागवड झालेल्या शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसला.

पावसामुळे पंचनामे नाहीत
जिल्हा कृषी विभागाकडून तालुकास्तरावर तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांच्या एकत्रित पीक पंचनामे करण्याचा सूचना आहेत. मात्र काही भागात पाऊस सुरू असल्यामुळे पंचनामे होऊ शकले नाहीत. पावसाने उघडीप दिल्यानंतर पंचनामे केले जातील, असेही कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. दोन

 दिवसांत 472.4 मिलीमीटर पाऊस
गेल्या दोन दिवसांत मावळात 472.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यामध्ये वडगाव (76.4 मिलीमीटर), तळेगाव (85 मिलीमीटर), लोणावळा (86 मिलीमीटर), शिवणे (46 मिलीमीटर), कार्ला (77 मिलीमीटर), खडकाळा (38 मिलीमीटर), काले कॉलणी (64 मिलीमीटर).

सिंचनाची उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांनी आगोदर (आगाऊ) लागवड केली, त्यामुळे काही भातपीक काढणीयोग्य झाले होते. हे प्रमाण चार-पाच टक्‍के आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर ज्या शेतकऱ्यांची भात काढणी राहिली असेल, त्यांनी लागलीच काढणी करावी आणि कापणी करून पीक सुरक्षित ठिकाणी ठेवावे. त्यानंतरच झोडपणी करावी. मावळात इंद्रायणी आणि फुले समृद्धी हे दोन वाण अधिक आहेत. हे वाण सहजासहजी भूईसपाट होत नाही अथवा दाणे पडत नाहीत, त्याचा फायदा निश्‍चितच शेतकरी वर्गाला झाला.
– देवेंद्र ढगे, तालुका कृषी अधिकारी

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.