दीपक पवार गरजले; शरद पवारांच्या उपस्थितीत दि. 7 जूनला कुडाळला मेळावा
सातारा- सातारा – जावळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसला चांगले वातावरण असून मागील निवडणुकीत मी चांगली लढत दिली होती. आगामी निवडणुकीतही पक्ष मलाच संधी देणार असून आ. शिवेंद्रराजेंना पाडूनच रिटायर्डमेंट घेऊ, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते दीपक पवार यांनी येथे पत्रकार परिषदेत लगावला. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत कुडाळ येथे दि. 7 जून रोजी सकाळी 11 वाजता शेतकरी मेळावा व जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती श्री. पवार यांनी दिली.
दीपक पवार म्हणाले, “”सातारा- जावळी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांबाबत आणि विकासकामांच्या अनुषंगाने खा. शरद पवार यांची सिल्वर ओक येथे भेट घेत सविस्तर चर्चा केली. त्यानुसार कुडाळ येथील मार्केट कमिटीच्या मैदानावर दि. 7 जूनला सकाळी 11 वाजता शेतकरी मेळावा व जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला खा. पवार यांच्यासह जिल्ह्यातील पक्षाचे खासदार, आमदार व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.” विरोधी पक्ष नेते अजित पवार यांची जाहीर सभा जावळी तालुक्यात झाल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते चांगले चार्ज होऊन कामाला लागले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुक्यात चांगले वातावरण तयार झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
बाजार समिती निवडणूक निकालानंतर दीपक पवार यांनी आता रिटायर्डंमेंट घ्यावी, असे आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले होते. त्याबाबत पवार म्हणाले, “”मी विधानसभेची निवडणूक लढवलेली आहे. माझी सातारा-जावळी मतदारसंघातून 2024 साठी तयारी सुरु आहे. त्याच निवडणुकीमध्ये आ. शिवेंद्रराजे यांना पाडणार म्हणजे पाडणारच. त्यांना पाडूनच मी रिटायरमेंट घेणार आहे. जावळी, महाबळेश्वर बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये एकाधिकारशाही, हुकूमशाही चालू नये म्हणून माजी आ. सदाशिव सपकाळ यांना सोबत घेऊन पॅनेल टाकले. ही सहकाराची निवडणूक होती. पक्षीय पातळीवरची निवडणूक नव्हती. तरीही पक्षाविरोधात ज्यांनी ज्यांनी त्या निवडणुकीत भूमिका घेतली होती. त्याबाबतची तक्रार पक्षाकडे झाली असून पक्षाने तशी नोंद घेतली आहे.”
महाविकास आघाडीच्या माध्यमातून सातारा पालिका निवडणूक लढणार
सातारा नगरपालिकेची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्यात येणार आहे. त्याच अनुषंगाने शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे पाटील, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्यासमवेत बैठका झाल्या आहेत. आणखी बैठका होणार असून जागावाटपावर चर्चा होणार आहे. आ. शशिकांत शिंदेही पालिकेच्या निवडणुकीत आमच्यासोबत असणार आहेत, अशी माहिती दीपक पवार यांनी यावेळी दिली.