पुणे -“पीएमआरडीए’ च्या हद्दीत सुरू केलेल्या पीएमपीच्या मार्गांसाठी “पीएमआरडीए’चा हिस्सा म्हणून तब्बल 188 कोटींची संचलन तूट मिळणार आहे. या पूर्वी शासनाने संचलन तुटीची जबाबदारी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे दिली होती.
गेल्या काही वर्षांत “पीएमआरडीए’ हद्दीत पीएमपीच्या साडेचारशे दैनंदिन फेऱ्या होत आहेत. तसेच, या लांब पल्ल्यांच्या असल्याने पीएमपीला संचलन तूटही सहन करावी लागत होती. व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी “पीएमआरडीएने संचलन तूट द्यावी’ अशी मागणी पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीत केली होती. त्यांनीही त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानंतर, पीएमपीने पीएमआरडीए हद्दीत झालेल्या संचलनाची माहिती पाठवित 188 कोटींच्या तूटीची मागणी केली होती. हा निधी 2023-23 पीएमआरडीएच्या अंदाजपत्रकात मान्य करण्यात आली आहे. मात्र,ही मान्यता देताना ही रक्कम एकवेळ देण्याचा उल्लेख करण्यात आल्याने भविष्यात ती पुन्हा मिळणार की नाही, याबाबत साशंकता आहे.
पहिल्यांदाच घटली संचलन तूट
पीएमपीच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच संचलन तूट घटली आहे. 2021-22 या आर्थिक पीएमपीला 372 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. तर, खर्च 1009 कोटी रुपयांचा झाला होता त्यामुळे संचलन तूट 718 कोटींवर गेली होती. त्यामुळे यंदाही ही तूट वाढेल अशी शंका होती. मात्र, ओमप्रकाश बकोरिया यांनी खर्चावर मर्यादा आणण्यासह, उत्पन्नवाढ तसेच प्रवासीकेंद्रीत सेवेसाठी विशेष प्रयत्न केले. त्याचे सकारात्मक परिणाम झाले असून पीएमपीचे उत्पन्न दुपटीने वाढत 662 कोटींवर गेले आहे. तर वार्षिक खर्चात 20 टक्के वाढ झाली असून खर्च 1,273 कोटींवर गेला आहे. त्यामुळे संचलन तूट सुमारे 108 कोटींनी घटली आहे. मात्र, आता पीएमआरडीए कडून तब्बल 188 कोटींचा निधीचा बूस्टर मिळणार असल्याने पीएमपीचा प्रवास नफ्याच्या दिशेने सुरू होणार आहे. तसेच, महापालिकेचा संचलन तुटीचा हिस्साही घटणार असल्याने महापालिकेसही दिलासा मिळणार आहे.