पुणे – करोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाची संपूर्ण यंत्रणा रात्रंदिवस झटत आहे. शहरात साथीला अटकाव घालण्यात काही प्रमाणात यश येत असले, तरी पुढील काही महिने धोक्याचे आहेत. ही बाब लक्षात घेऊन पालिकेकडे असलेले कर्मचारी अपुरे पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मागील पाच वर्षांत सेवा निवृत्त झालेल्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा मदतीसाठी रुजू करून घेतले जाणार आहे.
राज्यशासनाने याबाबतचे आदेश दिले असून तूर्तास अशा कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, हे कर्मचारी नियुक्त करताना त्यांची वैयक्तिक इच्छा तसेच त्यांच्या आरोग्याची स्थिती लक्षात घेऊनच त्यांना पुन्हा आरोग्य सेवेत घेतले जाणार आहे. देशभरात करोनाच्या रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीत शासकीय आरोग्य यंत्रणेवर ताण येत असून आधीच आरोग्य विभागाची अनेकपदे रिक्त आहेत.
पुण्यातही महापालिकेची सुमारे 50 टक्के आरोग्य विभागाची पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यास राज्य शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे. मात्र, ही भरती करण्यास काही कालावधी लागणार आहे. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा आरोग्य सेवेत तात्पुरत्या स्वरूपात बोलवण्याचे ठरवले आहे. त्यातच, शासनाने आता महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती वय 60 वर्षे केले असल्याने, गेल्या दोन वर्षांत सेवा निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना ही वाढीव 2 वर्षांची मुदत या वैद्यकीय आणीबाणीच्या कालावधीत देणे शक्य आहे का, याचाही विचार प्रशासनाकडून सुरू आहे.
वर्ग-1 ची पदभरती सुरू
पालिकेच्या आरोग्य विभागासाठी वर्ग-1 ची सुमारे 123 पदे तातडीनं भरण्यास राज्यशासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार, ही पदभरती करण्यासाठी काम सुरू करण्यात आले आहे. ही पदे तज्ज्ञ डॉक्टरांची असल्याने त्यांच्या शैक्षणिक पात्रतेला आणि अनुभवाला महत्त्व दिले जाणार असून त्यांच्या मुलाखती स्काइप आणि इतर ऑनलाइन सुविधांद्वारे घेतल्या जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.