शिरूर : कोरोनाच्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे मुंबई व इतर शहरातून येणारे नागरिक व्यावसायिक व व्यापारी तसेच अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठा करणारे आणि औद्योगिक वसाहती कामगार यांचा शिरूर शहरांमध्ये वाढत्या प्रमाणावर प्रतिबंध घालावा अशा आदेश शिरूरच्या तहसीलदार लैला शेख यांनी दिला.
या संदर्भात शिरूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे , पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांना तहसीलदाराने लेखी पत्र दिले आहे. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग व पुणे, मुंबई येथे वाढते रुग्ण लक्षात घेऊन इतर संसर्गित क्षेत्रातून नागरिक शिरूर शहरामध्ये येत असल्याने शहरातील नागरिकांना त्याचा संसर्ग किंवा पादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरांमध्ये पुणे मुंबई व इतर शहरातील नागरिक व्यावसायिक व्यापारी,विक्रेते, औद्योगिक क्षेत्रातील कामगार अत्यावशक वस्तूंचा पुरवठा करणारे यांचा शिरूर शहरांमध्ये वाढत्या प्रमाणात वापर होत आहे. अशा व्यक्तींना शहरांमध्ये प्रवेश प्रतिबंध करणे आवश्यक आहे. त्याकरिता खालील प्रमाणे शिरूर नगर परिषदेने , शिरूर पोलीस निरीक्षक यांनी आदेशाचे पालन करावे असे तहसिलदार लैला शेख यांनी सांगितले.
शिरूर शहरात एका ठिकाणी थांबून भाजीपाला विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला असून, नगर परिषदे मार्फत देण्यात आलेल्या भाजीपाला विक्री परवाना धारकामार्फत सकाळी सात ते दहा या वेळेत भाजीपाला विक्री करणे आवश्यक आहे. तसेच नगरपरिषदमध्ये मार्फत किराणा दुकानांना परवाने उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्यांच्या मार्फत किराणा मालाची घरपोच सेवा देण्यात यावी, कृषी सेवा आणि संलग्न दुकाने ही एक दिवस आड दुपारी एक वाजेपर्यंत खुली राहतील, गॅस एजन्सी चे वाहने व संबंधित कर्मचाऱ्यांना सकाळी व सायंकाळी दिलेल्या निर्धारित वेळेत शिरुर नगर परिषद हद्दीमध्ये प्रवेश देण्यात येईल.
याशिवाय इतर दुकाने अस्थापना व्यवसाय पुढील आदेश येईपर्यंत पूर्ण ते बंद असतील. औद्योगिक वसाहती येथे कार्यरत कर्मचारी ,शहराबाहेर नोकरी करणारे कर्मचारी यांना शिरुर नगर परिषद हद्दीतील येण्यास पायबंद घालण्यात आले असून, आस्थापनेवरील या कर्मचारी यांची आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये स्वतःची राहण्याची व्यवस्था करण्यात यावी, पुणे मुंबई व इतर शहरातून येणाऱ्या नागरिकांना शहरांमध्ये प्रवेश प्रतिबंधक करण्यात आलेला आहे.
शहरातील नागरिक व त्यांचे नातेवाईक मित्र यांच्याकडे येणे व थांबण्यास पूर्णता प्रतिबंध करण्यात आलेला आहे. असा प्रकार आढळून आल्यास संबंधितावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. शहरांमध्ये दूध विक्रेत्यांना केवळ सकाळी सात ते दहा या वेळेत घरोघरी फिरून दूध विक्री करण्यास परवानगी असेल. एका ठिकाणी बसून दूध विक्री करण्यास त्यांना प्रतिबंध करण्यात येत आहे .पिठाची गिरणी,मसाले दुपारी एक वाजेपर्यंत खुली रहातील.
तर दुपारी 1 वाजल्यानंतर रस्त्यावर नागरिकांना फिरण्यास प्रतिबंधक करण्यात येत असून असे फिरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. कोरोना संदर्भात काम करणाऱ्या शासकीय अधिकारी, कर्मचारी ,अंगणवाडी सेविका इत्यादी व्यक्तींना या आदेशातून सूट देण्यात येत आहे.
सर्व दुकानदार औद्योगिक वसाहतीतील कर्मचारी भाजीपाला विक्रेते नागरिक यांनी दिलेल्या नियमाचे कडेकोट पालन करावे अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही तहसीलदार लैला शेख यांनी देऊन याबाबत शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व मुख्य अधिकारी शिरुर नगर परिषद यांनी या पत्राचे अंमलबजावणी करावी असेही सांगण्यात आले आहे.